बदलापूर शहरात उल्हास नदीला पूर; राज्य महामार्ग अन् रेल्वे सेवा ठप्प, कर्जत रस्ताही पाण्याखाली
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2021 12:29 IST2021-07-22T11:56:20+5:302021-07-22T12:29:43+5:30
बदलापूर वांगणी रेल्वे स्थानकाच्या दरम्यान रेल्वे रूळ पूर्णपणे पाण्याखाली आल्याने कर्जत आणि मुंबईकडे जाणारी रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प झाली होती.

बदलापूर शहरात उल्हास नदीला पूर; राज्य महामार्ग अन् रेल्वे सेवा ठप्प, कर्जत रस्ताही पाण्याखाली
बदलापूर: बदलापूर शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील बदलापूर गावाकडे जाणार उल्हास नदीवरील पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. तर बदलापूर - कर्जत रास्ता देखील पाण्याखाली आला होता. त्यामुळे हा रस्ता देखील वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. बदलापूर वांगणी रेल्वे स्थानकाच्या दरम्यान रेल्वे रूळ पूर्णपणे पाण्याखाली आल्याने कर्जत आणि मुंबईकडे जाणारी रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प झाली होती.
रात्री बारा वाजेपासून पहाटे पाच वाजेपर्यंत शहरात मुसळधार पाऊस झाल्याने संपूर्ण बदलापूर शहरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. तर उल्हास नदीच्या काठावर असलेल्या वस्तीमध्ये पुराचे पाणी शिरले होते. अनेक गृहसंकुलातील तळ मधले पाण्याखाली आले होते. उल्हास नदीवरील बदलापूर गावाकडे जाणारा पूल आणि वालिवली गावाकडे जाणाऱ्या पुलाखालून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने हे दोन्ही मार्ग बंद करण्यात आले.
Video : बदलापूर शहरात उल्हास नदीला पूर; राज्य महामार्ग आणि रेल्वे सेवा ठप्प
— Lokmat (@MiLOKMAT) July 22, 2021
व्हिडीओ - पंकज पाटील pic.twitter.com/kqIBmUprco
शहरातील अनेक मोठे नाले देखील भरून वाहत असल्याने शहराच्या अंतर्गत भागात देखील नागरिकांना पावसाच्या पाण्याचा त्रास सहन करावा लागला. बदलापूर आणि अंबरनाथ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रात देखील पाणी गेल्याने या ठिकाणची यंत्रणा बंद करावी लागली आहे.