प्रभाग रचनेमध्ये फिक्सिंग, आमदाराची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार; १५ ते १६ प्रभागांत हेराफेरी, किसन कथोरे यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 12:04 IST2025-08-08T12:04:02+5:302025-08-08T12:04:50+5:30
...प्रभाग रचनेचे प्रारूप मंजुरीकरिता नगरविकास विभागाकडे पाठवले असून, त्याला अंतिम मंजुरी मिळण्यापूर्वी याची चौकशी करण्याची व बदलापूरची प्रभाग रचना नव्याने करण्याची मागणी कथोरे यांनी पत्रात केली.

प्रभाग रचनेमध्ये फिक्सिंग, आमदाराची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार; १५ ते १६ प्रभागांत हेराफेरी, किसन कथोरे यांचा आरोप
बदलापूर : आगामी नगरपालिका निवडणुकीकरिता एका विशिष्ट पक्षाच्या स्थानिक नेते व अधिकारी यांनी हातमिळवणी करून आपल्याला अनुकूल अशी प्रभाग रचना करवून घेतल्याचा थेट आरोप करणारे पत्र भाजप आ. किसन कथोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले आहे. कथोरे यांनी पत्रात पक्षाचा नामोल्लेख केला नसला तरी त्यांचा रोख शिंदेसेनेकडे असल्याचे स्पष्ट संकेत प्राप्त होत आहेत. प्रभाग रचनेचे प्रारूप मंजुरीकरिता नगरविकास विभागाकडे पाठवले असून, त्याला अंतिम मंजुरी मिळण्यापूर्वी याची चौकशी करण्याची व बदलापूरची प्रभाग रचना नव्याने करण्याची मागणी कथोरे यांनी पत्रात केली.
अंबरनाथ बदलापूर या दोन्ही नगरपालिकेच्या प्रभाग रचनेचा आराखडा निश्चित करून तो नगर विकास विभागाकडे पाठवला आहे. मात्र, बदलापूर शहरातील प्रभाग रचना करताना पालिकेतील अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप आ. कथोरे यांनी केला. काही नगरसेवकांना फायदा होईल, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या सोयीनुसार प्रभाग रचना करण्यात आली. १५ ते १६ प्रभागांमध्ये अशी हेराफेरी करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
बदलापुरात सोयीनुसार यंत्रणेचा वापर
प्रभाग रचनेमध्ये अधिकाऱ्यांनी बदलापुरातील एका विशिष्ट पक्षाच्या सोयीसाठी सर्व यंत्रणा वापरल्याचा आरोप कथोरे यांनी केला. त्यामुळे प्रभाग रचनेतील भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची, तसेच चुकीची प्रभाग रचना रद्द करून नव्याने प्रभाग रचना करण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी कथोरे यांनी फडणवीस यांच्याकडे केली.