ठाण्यात लवकरच पहिले मराठी भाषा वृद्धी केंद्र : शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 09:13 IST2025-10-08T09:13:01+5:302025-10-08T09:13:15+5:30
मराठी अभिजात भाषा सप्ताहानिमित्त आयोजित गौरव सोहळ्याला शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

ठाण्यात लवकरच पहिले मराठी भाषा वृद्धी केंद्र : शिंदे
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : मराठी भाषेच्या सक्षमीकरणासाठी ‘मराठी भाषा क्षमता वृद्धी केंद्र’ सुरू करण्यात येईल. त्या केंद्राच्या माध्यमातून मराठी तरुणांना स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन, साहित्य संदर्भ, केंद्रीय उपक्रमांची माहिती दिली जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी केली. पहिले केंद्र ठाण्यात सुरू करण्यात येईल, असेही शिंदे यांनी जाहीर केले.
मराठी अभिजात भाषा सप्ताहानिमित्त आयोजित गौरव सोहळ्याला शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शिंदे म्हणाले की, मराठी भाषेचे बळ वाढवण्यासाठी सरकारी पातळीवर आणि शालेय स्तरावर मराठी सक्तीची केली. मात्र, सक्तीने नव्हे तर भक्तीने मराठीचे बळ वाढवणे गरजेचे आहे. चित्रपट, ओटीटी वगैरेवरही मराठी भाषा वृद्धींगत होत आहे.
चांगल्या गोष्टींची सुरुवात
नगरविकास, उद्योग आणि मराठी भाषा विकास खाते यांनी एकत्रित येऊन मराठी सक्षमीकरणासाठी प्रयत्न केले पाहिजे. राज्यातील सर्व शहरांत मराठी भाषा क्षमता वृद्धी केंद्र सुरू केले जाणार आहे. त्याची सुरुवात ठाण्यातून होईल. सर्व चांगल्या गोष्टींची सुरुवात ठाण्यातून होते, असेही शिंदे म्हणाले.
काही लोक मतांकरिता मराठीचा वापर करतात. काही लोकांना निवडणूक आल्यावर मराठी माणसांची मते आठवतात, असा टोला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला.
घराबाहेर पडा, काम पाहा!
शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी अभिजात मराठी भाषेकरिता एक कोटी रुपयांचा निधी घोषित केला होता आणि त्याची पूर्तता आता लवकरच केली जाणार असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
शासन जसे मराठी भाषेच्या हिताकरिता काम करते, तसेच प्रयत्न नागरिकांनीही करावेत, सरकारला विधायक सूचना कराव्या, असे सामंत म्हणाले.
मराठी भाषा भवन कुठे आहे असे घरात बसून विचारणाऱ्यांनी घराबाहेर पडून त्याचे सुरू असलेले काम पाहावे, असा टोला सामंत यांनी ठाकरेंना लगावला.