ओमी टीमच्या पदाधिकाऱ्यांवर गोळीबार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2020 10:04 IST2020-10-23T10:04:34+5:302020-10-23T10:04:51+5:30

गायकवाड हे बांधकाम व्यावसायिक असून त्यांचे हार्डवेअरचे दुकान आहे. बुधवारी रात्री मित्र जहांगीर मोरे याच्यासोबत श्रीराम चौकातून घरी जात होते. कारमधील दोघांनी संदीप यांच्यावर लोखंडी रॉडने अचानक हल्ला केला. तसेच गोळीबार केला. 

fire on Omi team office bearers | ओमी टीमच्या पदाधिकाऱ्यांवर गोळीबार

ओमी टीमच्या पदाधिकाऱ्यांवर गोळीबार


उल्हासनगर : ओमी कलानी टीमचा पदाधिकारी व बांधकाम व्यावसायिक संदीप गायकवाड मित्रासह बुधवारी रात्री ११ वाजता श्रीराम चौकातून जात होते. त्याच वेळी कारमध्ये दबा धरून बसलेल्या दोघांनी संदीप यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला करून गोळीबार केला. मात्र, पोलिसांची गस्त घालणारी गाडी आल्याने संदीपचा जीव वाचला. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

गायकवाड हे बांधकाम व्यावसायिक असून त्यांचे हार्डवेअरचे दुकान आहे. बुधवारी रात्री मित्र जहांगीर मोरे याच्यासोबत श्रीराम चौकातून घरी जात होते. कारमधील दोघांनी संदीप यांच्यावर लोखंडी रॉडने अचानक हल्ला केला. तसेच गोळीबार केला. 

हल्ल्याच्या दरम्यान पोलिसांची गस्त घालणारी गाडी आल्याने, संदीप याने पोलिसांच्या गाडीचा आश्रय घेतला. त्यामुळे हल्लेखोरांनी कारसह पळ काढला. पोलिसांनी कारचा पाठलाग केला. मात्र, हल्लेखोरांनी कार उल्हासनगर रेल्वे स्टेशन परिसरात टाकून धूम ठोकली. पोलिसांनी हल्लेखोरांची गाडी ताब्यात घेतली असून तपासासाठी तीन पथके तैनात केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे यांनी दिली.

ओमी कलानी टीमच्या मागासवर्गीय सेलचे शहराध्यक्ष असलेले गायकवाड हल्ल्यात गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. हल्लेखोर लवकरच जेरबंद होतील, अशी माहिती भामे यांनी दिली.
 

Web Title: fire on Omi team office bearers