दहावीच्या तीन विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात; शाळा आणि पालकांमध्ये फीवरून वाद

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2019 02:09 AM2019-12-10T02:09:10+5:302019-12-10T02:09:18+5:30

मोहनपूरम परिसरात ही शाळा असून १५ पालकांनी २०१४ मध्ये आपल्या पाल्याला शासनाच्या आरटीईअंतर्गत अर्ज केले होते.

The fate of three Class X students is in danger; Disputes over fees between schools and parents | दहावीच्या तीन विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात; शाळा आणि पालकांमध्ये फीवरून वाद

दहावीच्या तीन विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात; शाळा आणि पालकांमध्ये फीवरून वाद

Next

अंबरनाथ : अंबरनाथ येथील गुरुकुल ग्रॅण्ड युनियन स्कूलमधील तीन विद्यार्थ्यांचे दहावीचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) केलेले अर्ज फेटाळले गेल्याने १५ पालकांचा शाळा व्यवस्थापनासोबत फीवरून वाद विकोपाला गेला आहे. शाळेने योग्य प्रस्ताव न भरल्यामुळेच हे प्रस्ताव फेटाळले गेल्याचा आरोप करत या पालकांनी शाळा व्यवस्थापनाला जबाबदार धरले आहे. मात्र, प्रस्ताव फेटाळण्यात आल्याने शाळेने फी भरण्यासाठी पाठपुरावा केल्याने हा वाद निर्माण झाला आहे. १० डिसेंबर ही परीक्षेचा अर्ज भरण्याची अंतिम तारीख असून शाळेच्या दाखल्याशिवाय अर्ज भरता येत नसल्याने या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष पणाला लागले आहे. यावरून पालकांनी आक्रमक होत व्यवस्थापनाविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे.

मोहनपूरम परिसरात ही शाळा असून १५ पालकांनी २०१४ मध्ये आपल्या पाल्याला शासनाच्या आरटीईअंतर्गत अर्ज केले होते. या अर्जानुसार शाळेने शासनाकडे संबंधित पालकांचा प्रस्ताव पाठवणे अपेक्षित होते. त्यानुसार, प्रस्ताव दाखल झाला. या प्रस्तावाला शासनाकडून २०१७ मध्ये उत्तर आले. तोपर्यंत या विद्यार्थ्यांच्या पालकांना वाटले, ही आपल्या पाल्याचे शिक्षण हे आरटीईअंतर्गत होणार आहे. त्यामुळे ते निश्चिंत होते. २०१७ मध्ये या विद्यार्थ्यांचे प्रस्ताव फेटाळल्याचे लक्षात आल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना पालकांना शाळेची फी भरण्यासाठी शाळेने नोटीस बजावली. शाळेकडून सातत्याने नोटीस बजावण्यात येत असताना दुसरीकडे पालक शासनाकडे आरटीईसंदर्भात शाळेने पुन्हा पाठपुरावा करण्याची अपेक्षा केली होती. त्यावर कोणताच तोडगा निघाला नाही.

१५ विद्यार्थी हे विविध वर्गांत शिकत आहेत; मात्र त्यातील तीन विद्यार्थ्यांना शाळेने नापास झाल्याचे कळवल्याने त्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी या विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेला बसण्यासाठी १७ नंबरचा अर्ज करण्याचे निश्चित केले. मात्र, दहावीची परीक्षा बाहेरून देण्यासाठी त्या विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला मिळणे गरजेचे होते. हा दाखला घेण्यासाठी जाणाऱ्या पालकांना शाळा प्रशासन
जुमानत नसल्याचा आरोप पालकांनी केला आहे.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, यासाठी पालकांनी ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता. पाटील यांनी शाळा प्रशासनाची भेट घेऊन किमान तीन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करण्याची मागणी केली. यासंदर्भात गेल्या आठवडाभर चर्चा सुरू होती. याबाबत शाळा प्रशासन सुरुवातीला सकारात्मक प्रतिसाद देत होती; मात्र शेवटच्या क्षणी शाळा प्रशासनाने फीसंदर्भात कोणतीही तडजोड न करण्याचा निर्णय घेतल्याने तीन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याच्या मार्गावर आहे. १० डिसेंबरला सायंकाळी ५ वाजेपर्यंतच दहावीच्या परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत आहे.

शाळेचा दाखला फी भरल्याशिवाय मिळणार नसल्याने या तिन्ही विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात सापडले आहे. या विद्यार्थ्यांपैकी दोन विद्यार्थ्यांच्या पालकांची आर्थिक परिस्थिती खराब असल्याने त्यांना ८० ते ९० हजार रुपये थकीत फी भरणे अवघड आहे. त्यामुळे या पालकांसमोर पाल्याचे शिक्षण अर्धवट ठेवण्याची वेळ येणार आहे. केवळ पैशांअभावी विद्यार्थ्यांचे नुकसान होणार असल्याने संताप व्यक्त होत आहे.

...तर आमच्यापुढे आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही!

आपली आर्थिक परिस्थिती नसल्यानेच आपण शाळेकडे आरटीईअंतर्गत अर्ज केले होते. मात्र, शाळेने तो प्रस्ताव पाठवताना त्यात अनेक त्रुटी ठेवल्या. तसेच जन्मदाखल्याचाही घोळ घातला होता. त्यामुळे शासनाने तो प्रस्ताव फेटाळला होता. शाळेच्या चुकीचा भुर्दंड आम्हाला भरावा लागत आहे. ८८ हजार रुपये फी भरणे हे आम्हाला शक्य नाही.

घरकाम करणारी बाई एवढी मोठी रक्कम आणणार कोठून, याचा विचार शाळा प्रशासनानाने करायला हवा होता, असे पालक मनीषा शिंदे यांनी सांगितले. शाळेकडे पाठपुरावा करण्यासाठी गेल्यावर शाळेने दोन वेळा आपल्याविरोधात पोलिसांत अदखलपात्र गुन्हे दाखल केले आहेत. शाळेच्या या दादागिरीला आपण वैतागलो असून मुलांचे शिक्षण थांबणार असेल, तर आत्महत्येशिवाय पर्याय राहिलेला नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

विद्यार्थ्यांच्या पालकांना त्यांच्या विद्यार्थ्यांचे आरटीईमध्ये प्रवेश झालेले नाही, याची कल्पना दिलेली होती. त्यानंतर, त्यांना फी भरण्यासंदर्भात सातत्याने पत्र पाठवण्यात आले आहे. त्यांनी त्या पत्रांकडे दुर्लक्ष केले आहे. फी भरलेली नसतानाही त्यांच्या विद्यार्थ्यांचे नववीपर्यंतचे शिक्षण थांबवण्यात आलेले नाही. त्यांनी फी भरली तर लागलीच त्यांचे शाळेचे दाखले देण्यात येतील. पालकांच्या चुकीमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असेल, तर त्याला शाळा नव्हे, तर त्यांचे पालक जबाबदार आहेत.
- मंजूषा शिंदे, अध्यक्ष, गुरुकुल ग्रॅण्ड युनियन स्कूल

शाळेसोबत चर्चा करण्याची भूमिका आमची होती. शाळा प्रशासनाला वेळही दिला होता. तडजोडीचा मार्ग काढण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र, शाळा प्रशासनाने केवळ वेळकाढूपणा केला आहे. त्यांना विद्यार्थ्यांसंदर्भात सहानुभूती नसल्याचे दिसत आहे. शाळेला फीमध्ये सूट देऊन काही रक्कम आपण स्वत: भरणार आहोत, याची कल्पना देऊनही शाळेने आपली ताठर भूमिका सैल केली नाही.
- प्रदीप पाटील, ब्लॉक अध्यक्ष, काँग्रेस

Web Title: The fate of three Class X students is in danger; Disputes over fees between schools and parents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.