Thane: शेतकऱ्यांची दिवाळी काळीच!; ठाण्यात राष्ट्रवादीचे आंदोलन
By सुरेश लोखंडे | Updated: October 17, 2025 16:48 IST2025-10-17T16:48:24+5:302025-10-17T16:48:37+5:30
Thane News: शेतकऱ्यांच्या न्यायहक्कांसाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळे कपडे परिधान करून राष्ट्रवादी काँग्रेस–शरद पवार पक्षाच्या कार्यकत्यांनी ‘काळी दिवाळी’ साजरी करीत शासनाचा निषेध केला.

Thane: शेतकऱ्यांची दिवाळी काळीच!; ठाण्यात राष्ट्रवादीचे आंदोलन
- सुरेश लोखंडे
ठाणे - शेतकऱ्यांच्या न्यायहक्कांसाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळे कपडे परिधान करून राष्ट्रवादी काँग्रेस–शरद पवार पक्षाच्या कार्यकत्यांनी ‘काळी दिवाळी’ साजरी करीत शासनाचा निषेध केला.
अतिवृष्टीने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना अद्यापही मदतीचा दिलासा मिळालेला नसल्याच्या निषेधार्थ या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडले. येथील शासकीय विश्रामगृहासमाेर पार पडलेल आंदाेलन आ. डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. यावेळी आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांनी काळे कपडे व काळ्या फिती बांधून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनादरम्यान सरकारच्या फसव्या घोषणांचा निषेध करण्यात आला.
यावेळी आंदोलनकर्त्या सरकारविरोधात घाेषणाबाजी करीत विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले. या मागण्यांमध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी. नियमित कर्ज भरणाऱ्यांना ७५ हजार रूपये प्रोत्साहन रक्कम द्यावी. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार मदत देण्यात यावी. किमान आधारभूत किंमत कायदा सर्व पिकांसाठी लागू करावा. पंचनामे वेळेत पूर्ण करून तत्काळ मदत जाहीर करावी. पंचनामे न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.
‘फक्त घोषणा नव्हे, कृती हवी’ – मनोज प्रधान
या आंदोलनावेळी बोलताना मनोज प्रधान म्हणाले, "सरकारने दिवाळीपूर्वी मदतीचे आश्वासन दिले होते, मात्र प्रत्यक्षात काहीच घडले नाही. कर्जमाफीचा ‘क’ शब्दही सरकार उच्चारायला तयार नाही. आम्ही मात्र जनतेच्या पाठिंब्याने रस्त्यावर लढा देत राहू."