कुणबी समाजात आता प्री-वेडिंगसह खर्चिक प्रथा होणार बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 08:31 IST2025-08-12T08:31:18+5:302025-08-12T08:31:18+5:30
एकदिवसीय सोहळ्याला तरुणांनी दिले समर्थन

कुणबी समाजात आता प्री-वेडिंगसह खर्चिक प्रथा होणार बंद
वाडा : कुणबी समाजातील लग्न सोहळ्यात काही अनिष्ट प्रथा वाढू लागल्याने सोहळे खर्चिक होऊ लागले आहेत. काही सामान्य कुटुंबातील पालक तर या प्रथांचे अनुकरण करण्यासाठी आणि मुलांच्या हौसेकरिता कर्ज काढतात. या अनिष्ट प्रथा बंद करण्यासंदर्भात वाडा, विक्रमगड तालुक्यांतील कुणबी समाजबांधवांची सभा रविवारी वाड्यात आयोजित केली होती. लग्नानिमित्त प्रीवेडिंग शूट, मेंदी यांसह इतर अनिष्ट प्रथांना आळा घालण्याचा ठराव एकमुखाने सभेत झाला.
कुणबी समाजातील लग्न सोहळे व या सोहळ्यात अनिष्ट प्रथांवर विचार मंथन व्हावे, यासाठी वाडा, विक्रमगड या दोन तालुक्यांतील कुणबी बांधवांची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी मुंबई विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू डॉ. अरुण सावंत, कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील, कुणबी समाज मंडळाचे अध्यक्ष हरिभाऊ पाटील, विलास आकरे आदी मान्यवरांसह समाजातील ५०० हून अधिक नागरिक उपस्थित होते.
वाढत्या खर्चिक प्रथांमुळे मूळ हेतूचा विसर: लग्नात टिळा लावणे, प्रीवेडिंग, मेंदी कार्यक्रमात मांसाहारी भोजन, दारूची पार्टी, ठराविकांनाच फेटे बांधणे असे अनेक प्रकार लग्न सोहळ्यात सुरू झाले आहेत. या प्रकारांमुळे लग्न सोहळ्याचा मूळ हेतू, परंपरा नामशेष होत आहेत. या प्रथा बंद करण्यासंदर्भात या बैठकीचे आयोजन केले असल्याचे सामाजिक कार्यकर्ते नरेश आकरे यांनी सांगितले.
एकदिवसीय सोहळ्याला तरुणांनी दिले समर्थन
डॉ. अरुण सावंत, विश्वनाथ पाटील, प्रवीण पाटील, मोहन पाटील, सुभाष पाटील, विलास आकरे आदी मान्यवरांनी यावेळी या अनिष्ट प्रथा बंद झाल्याच पाहिजेत, असे मत व्यक्त केले. अनेकांनी यापुढे एकदिवसीय लग्न सोहळा आयोजित करण्याचे आवाहन केले. काही अविवाहित तरुणांनी एकदिवसीय लग्न सोहळ्याला समर्थन देत एकदिवसीय कार्यक्रमाच्या माध्यमातूनच लग्न करणार असल्याची शपथ घेतली.