अभियंता रफिक शेख यांच्याकडून आढावा, ग्राहकांच्या अडचणी सोडवण्याचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2019 23:18 IST2019-07-16T21:46:33+5:302019-07-16T23:18:15+5:30
ग्राहकांच्या तक्रारी, एमआयडीसी परिसरातील अडचणी तात्काळ सोडवण्याचे आदेश

अभियंता रफिक शेख यांच्याकडून आढावा, ग्राहकांच्या अडचणी सोडवण्याचे आदेश
डोंबिवली : महावितरणच्या कल्याण(पूर्व) विभागाबाबत प्रसिद्ध झालेल्या विविध वृत्ताची नोंद घेत कल्याण परिमंडळाचे मुख्य अभियंता रफिक शेख यांनी कल्याण(पूर्व) विभागाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी 'ग्राहकांच्या तक्रारी कमीत कमी वेळेत सोडवा. एमआयडीसीमधील औद्योगिक ग्राहकांचा वीज पुरवठा बाधित होणार नाही, याकडे विशेष लक्ष द्या. तसेच कल्याण(पूर्व) विभागातील प्रत्येक शाखा अभियंता व उपअभियंता यांनी प्रत्येकी दोन व कार्यकारी अभियंता यांनी एका रोहित्राची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी घ्यावी.' असे आदेश दिले आहेत.
महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी प्रकाशगड या मुख्यालयी जून महिन्यात बैठक घेतली होती. यावेळी त्यांनी घरगुती, वाणिज्य व औद्योगिक ग्राहकांना विना व्यत्यय वीज पुरवठा देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने मुख्य अभियंता रफिक शेख यांनी कल्याण(पूर्व) विभागास भेट देऊन पाहणी केली आहे. यावेळी रफिक शेख म्हणाले, "घरगुती व औद्योगिक ग्राहक यांना अखंड वीज पुरवठा करण्यासाठी विभागीय पातळीवर खरेदी करण्यात आलेले साहित्य तात्काळ शाखा कार्यालयांपर्यंत पोहचवावे. एमआयडीसी करता दिन दयाळ उपाध्याय योजनेनंतर्गत 13.20 किमीची केबल बदलण्याचे काम सुरू असून यातील 1.30 किमीची केबल बदलली आहे. यातील उर्वरित कामही तात्काळ पूर्ण करा. याकरता अधिकचे मनुष्यबळ व एजन्सी वापरा. एमआयडीसी च्या ज्या परिसरात पक्षांमुळे फॉल्ट होतो तिथे वाहिन्यांना सुरक्षा कवच(बर्ड गार्ड) वापरा. देखभाल दुरुस्ती व झाडे कटाई करता वीज पुरवठा बंद करताना त्याचे योग्य नियोजन करा. त्याबाबत महावितरणकडे मोबाईल क्रमांक नोंद असणाऱ्या संबंधित ग्राहकांना पूर्व कल्पना द्या, असे आदेश दिले. या आढावा बैठकीस अधीक्षक अभियंता कल्याण मंडळ 1 चे सुनील काकडे, पायाभूत आराखडाचे अधीक्षक अभियंता प्रवीण परदेशी, कल्याण(पूर्व) विभागाचे कार्यकारी अभियंता धनराज बिक्कड व विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.