Embezzlement of Rs 5 lakh on the basis of forged signature | बनावट सहीच्या आधारे पाच लाखांचा अपहार

बनावट सहीच्या आधारे पाच लाखांचा अपहार

डोंबिवली : बँकेच्या खातेधारकाची बनावट सही करून आरटीजीएसद्वारे पाच लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी बँकेतील एका लिपिकासह अन्य दोघांना रामनगर पोलिसांनी शिताफीने तपास करून अटक केली आहे.

३० मार्चला पूर्वेतील नेहरू मैदाननजीक असलेल्या डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या ड्रॉप बॉक्समध्ये टाकलेल्या आरटीजीएस फॉर्म आणि विड्रॉल स्लीपवर बचत खात्याचा क्रमांक टाकून पैसे ट्रान्सफर करण्याची विनंती करण्यात आली होती. त्यानुसार, पाच लाखांची रक्कम डोंबिवली नागरी सहकारी बँकेतून अंधेरी येथील कोटक महिंद्रा बँकेत कमलेश मोहिते यांच्या नावाने असलेल्या खात्यात ट्रान्सफर झाली. दरम्यान, २२ जुलैला डोंबिवली नागरी सहकारी बँकेतील एक खातेधारक बँकेत पासबुक अपडेट करण्यासाठी आले होते. तेव्हा त्यांच्या बचत खात्यातून पाच लाखांची रक्कम मोहिते याच्या बँक खात्यात ट्रान्सफर झाल्याचे त्यांना समजले. मात्र, त्यांनी आपण पैसे ट्रान्सफर करण्याची कोणतीही प्रोसिजर केली नसल्याचे बँकेतील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना सांगितले.
अधिक चौकशी करता संबंधित बँक खातेधारकाच्या नावाने आरटीजीएसचा फॉर्म भरून त्यावर त्यांची बनावट सही करून पाच लाख रुपये ट्रान्सफर केल्याचे स्पष्ट झाले. हे प्रकरण रामनगर पोलीस ठाण्यात पोहोचले. पोलिसांनी केलेल्या तपासात कमलेश मोहिते, निरंजन वाघ आणि निलेश जाधव या तिघा आरोपींना अटक करण्यात आली आहे.
निरंजन हा बँकेतील कर्मचारी आहे. निरंजन आणि निलेश हे मित्र आहेत. तर, निलेश हा कमलेशचा जवळचा नातेवाईक आहे. निरंजनने बँकेतील खातेदाराच्या बचत खात्याचा क्रमांक आणि त्याची सही हुबेहूब मिळवून देण्यात सहकार्य केले. त्याआधारेच पाच लाखांची रोकड ट्रान्सफर करणे तिघांना शक्य झाले, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आहेर यांनी दिली.

काही रक्कम हस्तगत : तिन्ही आरोपींना अटक केली असून चार दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर त्यांची रवानगी आधारवाडी कारागृहातील न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. अपहार केलेली काही रक्कम मिळविण्यात यश आले असून, उर्वरित रक्कम लवकरच मिळेल, असेही आहेर यांनी सांगितले.

Web Title: Embezzlement of Rs 5 lakh on the basis of forged signature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.