अंबरनाथची संपूर्ण, तर बदलापूरमध्ये ६ प्रभागांची निवडणूक पुढे ढकलली
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 09:10 IST2025-12-01T09:09:56+5:302025-12-01T09:10:53+5:30
नव्या आदेशानुसार होणार निवडणूक; पत्रकार परिषदेत अधिकारी आणि उमेदवारांमध्ये बाचाबाची

अंबरनाथची संपूर्ण, तर बदलापूरमध्ये ६ प्रभागांची निवडणूक पुढे ढकलली
अंबरनाथ/बदलापूर : राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही नगरपालिकेच्या निवडणुकांवर परिणाम झाला आहे. बदलापूरमध्ये सहा प्रभागांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या असून, अंबरनाथमधील संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. दरम्यान, याबाबतची माहिती देणाऱ्या निवडणूक निर्णय अधिकारी आणि उमेदवार तसेच उमेदवारांच्या प्रतिनिधींमध्ये बाचाबाची झाली.
उमेदवारी अर्जाबाबत न्यायालयात दाद मागणाऱ्या उमेदवारांच्या याचिकेवर २३ नोव्हेंबर आणि त्यानंतर निकाल लागले त्या सर्व निवडणुका सुधारित वेळापत्रकानुसार घेण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत. दरम्यान, बदलापुरात प्रभाग क्रमांक ५ ब आणि प्रभाग १५ ब, प्रभाग क्रमांक १७ अ, प्रभाग क्रमांक १० ब, प्रभाग क्रमांक ८ अ आणि प्रभाग १९ अ मध्ये नव्या कार्यक्रमानुसार निवडणूक घ्यावी लागणार आहे.
अंबरनाथमध्ये नेमका गोंधळ काय?
अंबरनाथमध्ये नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी जे ९ अर्ज वैध ठरविण्यात आले होते, त्यापैकी साधना वाळेकर यांनी भाजपच्या उमेदवार तेजश्री करंजुले यांच्या उमेदवारी अर्जामध्ये हरकत घेतली. या हरकतीवर २५ नोव्हेंबरला न्यायालयाने निकाल दिला. मात्र, माघार घेण्यासाठी अवघा एकच दिवस दिला गेला.
२५ नोव्हेंबरला निकाल लागल्यानंतर तक्रारदार वाळेकर यांनी त्याच दिवशी उमेदवारी अर्ज मागे घेतला. तक्रारदारानेच अर्ज मागे घेतल्यामुळे पालिका अधिकाऱ्यांनी यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडेच अहवाल पाठविला होता.
काही प्रभागांत निवडणूक २० डिसेंबरला
बदलापूरच्या काही प्रभागांतील नगरपालिका निवडणूक आता २० दिवस लांबणीवर गेली असून, पूर्वी २ डिसेंबरला होणारे मतदान आता २० डिसेंबरला होणार आहे. सर्वपक्षीय उमेदवारांसह स्थानिक प्रशासनालाही धक्का बसला असून, अचानक आलेल्या आदेशामुळे सर्वच अचंबित झाले आहेत. दोन दिवसांवर निवडणूक आलेली असताना अचानक निवडणूक पुढे ढकलण्याच्या निर्णयामुळे सर्वांनीच संताप व्यक्त केला आहे.
वाड्यात प्रभाग १२ तर पालघरमध्ये प्रभाग १ ब च्या सदस्यपदाची निवडणूक स्थगित
वाडा नगरपंचायतीच्या प्रभाग १२ शास्त्रीनगर नगरसेवकपदाच्या निवडणुकीला जिल्हा न्यायालयाने स्थगिती दिली. येथे शिंदेसेनेचे प्रसाद ठाकरे हे ठेकेदार असल्याचे सांगत त्यांचे नामनिर्देशनपत्र अवैध ठरविण्यात आले होते. त्याला ठाकरेंनी आव्हान दिले होते.
पालघर नगरपरिषद प्रभाग क्रमांक १ ब म्हणजेच पालघर पूर्वच्या नगरसेवकपदाच्या निवडणुकीला पालघर न्यायालयाच्या जिल्हा न्यायाधीशांनी स्थगिती दिली. शिंदेसेनेचे उमेदवार रवींद्र म्हात्रे यांच्या अर्जावर ठाकरे गटाचे आरिफ कलाडिया यांनी छाननीदरम्यान हरकत घेतली. अधिकाऱ्यांनी म्हात्रे यांना निवडणूक लढविण्याची परवानगी दिली होती. याविरोधात कलाडिया यांनी अपील केले होते.