- नितीन पंडित
लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : कोरोनाचा धोका वाढू नये म्हणून देशभर नागरिकांना कोरोनापासून बचाव करणाऱ्या लसीकरणास सुरुवात झाली आहे. मात्र, लसीकरणाचा दुसरा डोस घेऊन प्रतीक्षा कक्षात थांबलेल्या इसमास चक्कर आल्याने त्यास उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केल्याची घटना भिवंडीतील भाग्यनगर येथील लसीकरण केंद्रात मंगळवारी घडली.
मृत्यूचे नेमके कारण अजूनही समजले नसल्याने आरोग्य विभागातदेखील खळबळ उडाली आहे.सुखदेव किर्दत (वय ४५), असे मृत्यू झालेल्या इसमाचे नाव असून, ते भिवंडीतील एका खासगी डॉक्टरकडे वाहनचालक म्हणून काम करत होते. मंगळवारी सकाळी ११ वाजता ते कोविड लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी शहरातील भाग्यनगर येथील कोविड लसीकरण केंद्रात गेले असता दुसरा डोस घेतल्यानंतर ते प्रतीक्षागृहात थांबले होते. त्यानंतर साधारण पंधरा मिनिटांनी त्यांना चक्कर आल्याने ते खाली पडल्याने त्यांना उपचारासाठी भिवंडीतील स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. किर्दत हे सकाळी ११ वाजता लसीकरण केंद्रात आले. त्यांचा रुग्ण इतिहास व इतर वैद्यकीय बाबींची चौकशी व तपासणी केली असता सर्व व्यवस्थित होते. त्यानंतरच त्यांना लसीकरणाचा दुसरा डोस दिला. मात्र, प्रतीक्षागृहात किर्दत बसले असता त्यांना चक्कर आल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठविले, अशी माहिती लसीकरण लसीकरण केंद्रातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी दिली. या घटनेची संपूर्ण चौकशी करण्याची मागणी मयत सुखदेव किर्दत यांची पत्नी सोनाली किर्दत यांनी केली आहे.
लस घेतल्यानंतर किर्दत यांचा मृत्यू नेमक्या कोणत्या कारणाने झाला याबाबत शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर माहिती मिळेल, त्यासाठी ठाणे आरोग्य विभागाकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथकदेखील भिवंडीत दाखल झाले आहे. शवविच्छदन अहवालानंतरच नेमके कारण समजेल.
-डॉ. के.आर. खरात,
मुख्य वैद्यकीय अधिकारी, भिवंडी मनपा
दुसरा डोस घेणार असल्याची माहिती सकाळी मला माझ्या पतीने दिली होती. नेहमीप्रमाणे आज ते कामावरदेखील गेले. मात्र, दुपारी मला त्यांचा अपघात झाला असल्याचा फोन आल्याने मी आयजीएम रुग्णालयात आले असता त्यांच्या निधनाची बातमी समजली. या घटनेने मला धक्का बसला असून, या घटनेची सखोल चौकशी करून मला न्याय द्यावा
सोनाली किर्दत, मयत सुखदेव किर्दत यांची पत्नी
Web Title: The driver who took the second dose of Corona Vaccine died in Bhiwandi
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.