भिनार येथील आदिवासी बांधवांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या सुटणार; लघु नळ योजनेला मंजुरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2021 18:12 IST2021-05-26T18:04:31+5:302021-05-26T18:12:55+5:30
भिनार आदिवासी वस्तीमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी लघु नळ पाणीपुरवठा योजना मंजूर झाली असून या लघु नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा शुभारंभ भाजप नगरसेवक सुमित पाटील यांच्या शुभहस्ते बुधवारी पार पडले.

भिनार येथील आदिवासी बांधवांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या सुटणार; लघु नळ योजनेला मंजुरी
नितिन पंडीत
भिवंडी - मे महिन्याच्या शेवटी तालुक्यातील ग्रामीण भागात पाणी टंचाईची समस्या नेहमीच गंभीर होत असते त्यातच भिनार ग्राम पंचायतीच्या अखत्यारीत असलेल्या आदिवासी पाड्यातील आदिवासी बांधवांना मे महिन्यात नेहमीच पिण्याच्या पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत असल्याने या ठिकाणी नळ पाणी पुरवठा योजना राबविण्याची मागणी भाजपा आदिवासी मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष तथा आदिवासी प्रकल्प स्तरीय आढावा समिती सदस्य महादेव घाटाळ यांनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प शहापूर यांच्याकडे लावून धरली होती. त्यासाठी पाठपुरावा करून भिनार आदिवासी वस्तीमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी लघु नळ पाणीपुरवठा योजना मंजूर झाली असून या लघु नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा शुभारंभ भाजप नगरसेवक सुमित पाटील यांच्या शुभहस्ते बुधवारी पार पडले.
ग्राम पंचायत निधी भूमिगत गटार, आदिवासी वस्ती मुख्य रस्ता, गणेश घाट, सहा सीट शौचालय आदी विकास कामे तसेच पंचायत समिती सदस्या संचिता भोईर यांच्या निधीतून हायमास्ट लाइट या विविध कामाचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा देखील याप्रसंगी पार पडला. याप्रसंगी भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष निलेश गुरव, ओबीसी मोर्चा भाजप तालुकाध्यक्ष तथा भिवंडी पंचायत समिती उपसभापती गुरुनाथ जाधव , पंचायत समिती सदस्य सचिन भोईर, विलास भोईर, बाळाराम भोईर, सोनू भोईर, शिवराम भोईर आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान भिवंडीचे खासदार कपिल पाटील व आमदार किसन कथोरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला विकास कामे मंजूर झाली असून या विकास कामांबरोबरच ठक्कर बाप्पा योजनेतून देखील तालुक्यातील विविध ग्राम पंचातींना निधी उपलब्ध झाला आहे. अशी प्रतिक्रिया भाजपा आदिवासी मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष तथा आदिवासी प्रकल्प स्तरीय आढावा समिती सदस्य महादेव घाटाळ यांनी दिली आहे.