डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका विद्यार्थ्यांसाठी खुली करा - मनसे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2020 17:16 IST2020-10-17T16:41:04+5:302020-10-17T17:16:58+5:30
Ulhasnagar : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी महापालिकेने अभ्यासिका बंद केली. दरम्यान, कोरोनचे रुग्ण वाढल्याने अभ्यासिकेला कोविड सेंट्रल केंद्र बनविण्यात आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका विद्यार्थ्यांसाठी खुली करा - मनसे
उल्हासनगर : युपीएससी व एमपीएससी परीक्षेसह स्पर्धात्मक परीक्षेचा अभ्यास गोरगरीब व गरजू विद्यार्थांना करता, यावा म्हणून महापालिकेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका बांधली. कोरोनाचा प्रभाव कमी होऊन अभ्यासिकेत कोविड सेंटरमध्ये रुग्ण नसल्याने मुलांना अभ्यासासाठी खुली करा, अशी मागणी मनसेने महापालिका आयुक्तांना केली. व्यापारी केंद्र म्हणून राज्यासह देशात नावलौकिक असलेल्या शहराची ओळख शैक्षणिक केंद्र म्हणून व्हावी. यासाठी तत्कालीन महापालिका आयुक्त मनोहर हिरे यांनी दोन मजली सर्व सुविधायुक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने अभ्यासिका बांधण्याला परवानगी देण्यात आली.
युपीएससी व एमपीएससी यांच्यासह विविध स्पर्धात्मक परीक्षेची तयारी गोरगरीब व गरजू मुलांना करता यावी. हा उद्देश अभ्यासिका बांधण्यामागचा महापालिकेचा होता. अभ्यासिका बांधण्याच्या दरम्यान देशातील पहिली अंध उपजिल्हाधिकारी बनण्याचा मान शहरातील प्रांजली पाटील यांना मिळाला. तर दुसऱ्याच वर्षी अभिषेक टाळे यांच्यासह दोन जण युपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होऊन देश सेवेत दाखल झाले. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी महापालिकेने अभ्यासिका बंद केली. दरम्यान कोरोनाचे रुग्ण वाढल्याने अभ्यासिकेला कोविड सेंट्रल केंद्र बनविण्यात आले.
गेल्या सहा महिन्यापासून कोविड सेंटरमध्ये रुपांतरीत झालेल्या अभ्यासिकेत सद्यस्थितीत एकही रुग्ण ठेवले जात नाही. शासनाने युपीएससीसह एमपीएससी व इतर स्पर्धात्मक परीक्षा घेण्याचा निर्णय घेतल्याने गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका खुली करण्याची मागणी मनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख यांनी महापालिका आयुक्तांना भेटून निवेदनाद्वारे केली. देशमुख यांच्या सोबत पक्षाचे संजय घुगे, शालिग्राम सोनवणे, सचिन बेंडके, मुकेश सेठपलानी, तन्मेश देशमुख, हितेश मेहरा यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.