ठाणे जिल्ह्यात सुरु होणाऱ्या शाळांसाठी नियमांच्या काटेकोर अंमलबजावणींचे जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2021 12:04 IST2021-10-02T12:04:17+5:302021-10-02T12:04:32+5:30
पाचवी ते बारावी व शहरी भागातील आठवी ते बारावी चे वर्ग ४ ऑक्टोबरपासून सुरू करण्यास शासनस्तरावरून मान्यता देण्यात आली आहे.

ठाणे जिल्ह्यात सुरु होणाऱ्या शाळांसाठी नियमांच्या काटेकोर अंमलबजावणींचे जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते बारावी व शहरी भागातील इयत्ता आठवी ते बारावीच्या शाळांचे वर्ग सोमवार ४ ऑक्टोबर पासून सुरू करण्यात येणार आहेत. शाळा सुरू करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचनांची काटेकोर व तंतोतंत अंमलबजावणी संपूर्ण ठाणे जिल्हा कार्यक्षेत्रामध्ये करण्यासाठी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी अधिसूचना जारी केली आहे.
या अधिसूचनेत जिल्हाधिकारी श्री. नार्वेकर यांनी म्हटले आहे की, २४ सप्टेंबर रोजीच्या शासन परिपत्रकानुसार राज्यातील ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते बारावी व शहरी भागातील आठवी ते बारावी चे वर्ग ४ ऑक्टोबरपासून सुरू करण्यास शासनस्तरावरून मान्यता देण्यात आली आहे. त्यासाठी महत्वपूर्ण अतिरिक्त मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत.
प्रत्येक शाळेमध्ये हेल्थ क्लिनिक सुरू करणे, शाळेत येतांना घ्यावयाची काळजी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी नविन मार्गदर्शक सूचना, खेळाच्या मैदानाबाबत मार्गदर्शन, आजारी विद्यार्थी शोधणे, विद्यार्थ्यांवरील मनोसामाजिक परिणामांबाबत शिक्षकांना अवगत करणे, विद्यार्थ्यांच्या मनोसामाजिक स्वास्थ्याबाबत शिक्षकांना मार्गदर्शन, शिक्षक-पालक बैठकीत चर्चा, घरात प्रवेश करतांना घ्यावयाची काळजी व सीएसआर निधीचा उपयोग करणे आदी महत्वपूर्ण मार्गदर्शक सूचना राज्य शासनाच्या परिपत्रकात देण्यात आल्या आहेत. त्यानुसार या आदेशांची संबंधितांनी तात्काळ अंमलबजावणी करावी. त्यास कोणी टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास त्यांच्या विरूद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कलम ५१ ते ६०, भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम, १८९७ व भारतीय दंड संहिता १८६० मधील कलम १८८ नुसार दंडनीय/ कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही या अधिसूचनेद्वारे देण्यात आला आहे.