खारेगाव रेल्वे उड्डाणपुलाला धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा   

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2022 09:06 PM2022-01-15T21:06:33+5:302022-01-15T21:06:54+5:30

Thane News: खारेगाव येथील रेल्वे उड्डाणपूल हा सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांमधून झाला असून ठाण्यावर अपार प्रेम असलेले दिवंगत जिल्हाप्रमुख धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव या उड्डाणपुलाला देण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे नगरविकास मंत्री आणि ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी येथे केली.

Dharmaveer Anand Dighe's name for Kharegaon railway flyover, announcement of Urban Development Minister Eknath Shinde | खारेगाव रेल्वे उड्डाणपुलाला धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा   

खारेगाव रेल्वे उड्डाणपुलाला धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा   

Next

ठाणे - खारेगाव येथील रेल्वे उड्डाणपूल हा सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांमधून झाला असून ठाण्यावर अपार प्रेम असलेले दिवंगत जिल्हाप्रमुख धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव या उड्डाणपुलाला देण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे नगरविकास मंत्री आणि ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी येथे केली. या उड्डाणपुलाच्या उभारणीत वेळोवेळी सगळ्यांनी पाठपुरावा केल्यामुळे हा उड्डाणपूल उभा राहू शकला आहे. त्यामुळे कोणी श्रेयवादात पडू नये, अशी स्पष्टोक्तीही त्यांनी केली.

खारेगाव येथील रेल्वे उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा आज पार पडला त्यावेळी बोलताना त्यांनी ही बाब स्पष्ट केली. या पुलाच्या उभारणीत बराच कालावधी गेला असला तरीही  त्यामुळे आता रेल्वे फाटक ओलांडताना होणारे अपघात टळणार असल्याचे समाधान वाटत असल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले.  भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी या फाटकाच्या ठिकाणी रेल्वे अपघातात आजवर मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली.

मध्य रेल्वे आणि ठाणे महानगरपालिका यांनी एकत्रितपणे तयार केलेल्या या रेल्वे उड्डाणपुलासाठी ३८ कोटी रुपये खर्च करण्यात आला. रेल्वे रुळांवरील पुलाच्या भागाचे काम मध्य रेल्वेने, दोन्ही बाजूकडील पोहोच रस्ता आणि पादचारी पुलाचे काम ठाणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच, महापालिकेने पोहोच रस्त्यासाठी आवश्यक असलेल्या मफतलाल कंपनीच्या जमिनीच्या अधिग्रहणासाठी ४१ कोटी रुपयेही अदा केले.

२००० साली या पुलाची मागणी सर्वप्रथम करण्यात आली होती. तेव्हापासून असंख्य अडथळ्यांची शर्यत पार पाडत, सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे हा उड्डाणपूल झाला, असे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. पुलाला मंजुरी २००८ मध्ये मिळाली होती, पण कामाला गती खऱ्या अर्थाने २०१४ नंतर आली, असेही ते म्हणाले. आधी खारेगावचं मैदान वाचवण्यासाठी आरेखन बदलण्यात आले. तर नंतर ४१ कोटी रुपये मफतलाल कंपनीला देऊन त्यानंतर या पुलाच्या पोहोच रस्त्यांचे काम पूर्ण केले गेले. या काळात अनेकांनी वेळोवेळी पाठपुरावा केल्यानेच आज या पुलाचे काम पूर्ण झाले असून हे श्रेय एकट्याचे नसून सगळ्यांचे आहे, असेही ते म्हणाले.

कळवा-मुंब्रा येथील विकासकामांना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कायमच झुकतं माप दिलं असून त्यांनी कधीही त्यात दुजाभाव केलेला नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. या पुलाच्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रश्नच नसून त्यामुळे लोकांचे प्राण वाचत आहेत हे जास्त समाधानकारक असल्याचे ते म्हणाले.

एकनाथ शिंदे आणि आपल्यात फार आधीपासूनच मैत्रीचा अदृश्य धागा असून तो आपण कायम जपला आहे. निधी मंजुरीसाठी कधीही एकनाथ शिंदे यांच्याकडे जावं लागलं नाही. सत्ताधारी कसा असावा, याचं ते उत्तम उदाहरण आहेत, अशा शब्दात डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी एकनाथ शिंदे यांचे आभार मानले.

आज पार पडलेल्या या सोहळ्याला ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विपीन शर्मा, उपमहापौर पल्लवी कदम, सभागृह नेते अशोक वैती, स्थायी समिती सभापती संजय भोईर, विरोधी पक्षनेते आश्रफ शानू पठाण आणि शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नगरसेवक उपस्थित होते.

Web Title: Dharmaveer Anand Dighe's name for Kharegaon railway flyover, announcement of Urban Development Minister Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.