ठाण्यातील १,३०० झाडांवर कुऱ्हाड चालविण्याचा विकासकाचा ‘डाव’, वृक्षांचे वय लपवल्याचे वनविभागाच्या पाहणीत उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 08:55 IST2025-04-18T08:50:38+5:302025-04-18T08:55:38+5:30

Thane News: वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत विकास प्रस्तावाअंतर्गत एकाच वृक्षतोडीला परवानगी देणे अपेक्षित असताना विकासकाने चारवेळा परवानगी मागितली.

Developer's 'plot' to axe 1,300 trees in Thane, Forest Department inspection reveals hiding the age of the trees | ठाण्यातील १,३०० झाडांवर कुऱ्हाड चालविण्याचा विकासकाचा ‘डाव’, वृक्षांचे वय लपवल्याचे वनविभागाच्या पाहणीत उघड

ठाण्यातील १,३०० झाडांवर कुऱ्हाड चालविण्याचा विकासकाचा ‘डाव’, वृक्षांचे वय लपवल्याचे वनविभागाच्या पाहणीत उघड

ठाणे : एका नामांकित विकासकाने चार टप्प्यांत १,३०० वृक्षतोडीला परवानगी मागितली असल्याची धक्कादायक बाब उघड झाली. यातील काही वृक्ष हे शंभर वर्षांपेक्षा जास्त काळ ठाणेकरांचे ऊन, पावसापासून रक्षण करीत आहेत. अनेक वृक्ष जुने असतानाही त्यांचे वय कमी दाखवून कुऱ्हाड चालविण्याचा विकासकाचा हेतू वनविभागाने केलेल्या पाहणीत उघड झाला आहे. 

वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत विकास प्रस्तावाअंतर्गत एकाच वृक्षतोडीला परवानगी देणे अपेक्षित असताना विकासकाने चारवेळा परवानगी मागितली. वनविभाग व वृक्ष प्राधिकरण विभागाच्या माजी सदस्यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. 

ठाणे महापालिका हद्दीत मेट्रोच्या कामासाठी, घोडबंदर सेवा रस्ता मुख्य हायवेमध्ये घेतला जात असताना, बोरिवली टनेलच्या कामाकरिता, तसेच उन्नत मार्गात येणाऱ्या वृक्षांच्या तोडीला महापालिकेने परवानगी दिली आहे. त्यात आता खासगी विकासकाला तर १,३०० वृक्ष तोडायला परवानगी हवी आहे. 

ठाणे महापालिका हद्दीत पोखरण रोड नं. २ येथे मौजे माजिवडे येथे  विकास प्रस्ताव क्र. एस ०४-०१८३-२० (प्लॉट बी) सेक्टर ४, फेज १, २ व ३ अंतर्गत अर्जदार विकासक यांनी सुरुवातीला २२३ वृक्ष तोडणे व ३६१ वृक्ष पुनर्रोपण करणे व फेज २ मध्ये १९२ वृक्ष तोडणे व १०७ वृक्ष पनर्रोपण, फेज ३ मध्ये १०२ वृक्ष तोडणे व ४५ वृक्ष पुनर्रोपण करणे असे अर्ज दाखल केले आहेत. त्यावर महापालिकेने सूचना, हरकती मागविल्या होत्या. वृक्ष प्राधिकरण विभागाचे माजी सदस्य विक्रांत तावडे यांनी हरकत दाखल केली. 

महत्त्वाच्या हरकती 

भूखंडावरील वृक्षगणना अहवाल व प्रत्यक्षात सादर केलेली वृक्षसंख्या, त्यांचे वय, त्यांचा घेर, उंची यामध्ये तफावत असल्याचा अहवाल परिक्षेत्र वनअधिकारी, ठाणे यांनी डिसेंबर २०२३ मध्ये सादर केला; परंतु या सूचनांचा विचार न करता वृक्षतोड आणि पुनर्रोपणास विकासकास परवानगी दिल्याची माहिती तावडे यांनी दिली. 

दुसरीकडे वृक्ष प्राधिकरण समिती सभेमध्ये एका विकास प्रस्तावाअंतर्गत एकदाच वृक्षतोड, पुनर्रोपण करण्याबाबत परवानगी देण्याबाबत निर्णय झालेला असताना त्याचे उल्लंघन करून विकासकाला चार वेळा परवानगी देण्यात आली.

एका भूखंडावरील ले-आऊटमध्ये समाविष्ट असलेल्या सर्व वृक्षांची गणना अर्जदारामार्फत सादर केली जाते. एकूणच १३०० वृक्ष तोडणे व पुनर्रोपण करण्याच्या तयारीत वृक्ष प्राधिकरण विभाग असल्याचा दावा त्यांनी केला.

महापालिकेने केलेल्या वृक्षगणनेसोबत तपासणी करून पडताळून पाहण्यात येते. त्यावरून किती वृक्ष बाधित होणार, किती पुनर्रोपण केले जाणार याची माहिती मिळते. मात्र, या प्रस्तावात तसे झाले नसल्याचे दिसत आहे. 

वनविभागाने घेतलेले आक्षेप

वनविभागाने केलेल्या पाहणीत विकासकाने वृक्षांचे वयोमान कमी दाखवले आहे. तसेच या जागेत क्रमांक ७३ मोहा वृक्षाचे वय हे १०० वर्षांपेक्षा अधिक असल्याचे तपासणीत आढळून आले.  या व इतर वृक्षांचे वय कमी दाखवण्याची क्लृप्ती विकासकाने केल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे.

विकासकाने वृक्षतोडीकरिता मागितलेल्या परवानगीचे हे प्रकरण जुने आहे. मात्र, अद्याप त्याला परवानगी दिलेली नाही. - मधुकर बोडके, उपायुक्त, वृक्ष प्राधिकरण विभाग, ठाणे महापालिका

Web Title: Developer's 'plot' to axe 1,300 trees in Thane, Forest Department inspection reveals hiding the age of the trees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.