लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : दहा लाखांच्या व्यावसायिक कर्जाचा हप्ता थकविल्यामुळे व्यावसायिकाच्या पत्नीला उचलून नेण्याची धमकी देणाऱ्या खासगी वित्तीय कंपनीच्या प्रतिनिधीविरुद्ध वर्तकनगर पोलीस ठाण्यात प्रशांत पांचाळ (वय ४२) यांनी अदखलपात्र तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, मनसेने या वित्तीय कंपनीविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली आहे.लोकमान्यनगर येथील रहिवासी पांचाळ यांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांनी एका खासगी वित्तीय संस्थेकडून दहा लाखांचे व्यावसायिक कर्ज घेतले आहे. कोरोनामुळे सुरू असलेले लॉकडाऊन तसेच त्यांना स्वत:लाही कोरोनाची बाधा झाल्यामुळे एक महिन्याचा कर्जाचा हप्ता ते भरू शकले नाहीत. मेन्टीफी फायनान्स कंपनीच्या राज शुक्ला या प्रतिनिधीने १५ एप्रिल २०२१ रोजी दुपारी दोन वाजता त्यांना या हप्त्याच्या वसुलीसाठी फोन केला. तेव्हा पांचाळ यांनी डिपॉझिटमधून हप्ता कपात करा, असे त्यांना सांगितले. याचा राग आल्याने पांचाळ यांना त्याने शिवीगाळ करून त्यांच्या पत्नीला उचलून नेण्याची धमकी दिली. तसेच, त्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. दरम्यान, पांचाळ यांच्या घरी शुक्ला याच्या सांगण्यावरून सुरेश नामक वसुली प्रतिनिधी बुधवारी आला होता. पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे शहर उपाध्यक्ष संदीप पाचंगे यांच्यासह कार्यकर्त्यांनी मध्यस्थी केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. या प्रकरणी पांचाळ यांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात धमकी देणे, शिवीगाळ केल्याची तक्रार बुधवारी दाखल केली आहे.दरम्यान, कर्जासाठी कोणाच्याही पत्नीला उचलून न्यावे, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. त्यामुळे या फायनान्स कंपनीसह शुक्ला याच्यावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी मनसेने वर्तकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांना पत्राद्वारे केली आहे.
कर्जाचा हप्ता थकविल्याने पत्नीला उचलून नेण्याची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2021 23:58 IST
दहा लाखांच्या व्यावसायिक कर्जाचा हप्ता थकविल्यामुळे व्यावसायिकाच्या पत्नीला उचलून नेण्याची धमकी देणाऱ्या खासगी वित्तीय कंपनीच्या प्रतिनिधीविरुद्ध वर्तकनगर पोलीस ठाण्यात प्रशांत पांचाळ (वय ४२) यांनी अदखलपात्र तक्रार दाखल केली आहे.
कर्जाचा हप्ता थकविल्याने पत्नीला उचलून नेण्याची धमकी
ठळक मुद्दे ठाण्यात खासगी वित्तीय कंपनीचा तगादा वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार