"सामंतांनी सांगितलेलं राजन साळवींना तिकीट द्या, पण..."; एकनाथ शिंदेंनी सांगितली इनसाईड स्टोरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 18:13 IST2025-02-13T18:09:39+5:302025-02-13T18:13:38+5:30
माजी आमदार राजन साळवी यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली.

"सामंतांनी सांगितलेलं राजन साळवींना तिकीट द्या, पण..."; एकनाथ शिंदेंनी सांगितली इनसाईड स्टोरी
Eknath Shinde: ठाकरे गटाचे राजापूर-लांजाचे माजी आमदार राजन साळवी यांनी उपनेतेपदाचा राजीनामा देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. राजन साळवी यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पु्न्हा धनुष्यबाण हाती घेतला. यावेळी राजन साळवी यांनी माजी खासदार विनायक राऊत यांच्यावर निशाणा साधला. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र डागलं. या पक्षामध्ये जो काम करतो तो पुढे जातो असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.
"आज कोकणातला ढाण्या वाघ पुन्हा पुन्हा त्याच्या गुहेमध्ये सामील झाला आहे. मी राजन साळवी आणि त्यांच्यासोबत आलेल्या सर्वांचे शिवसेनेमध्ये स्वागत करतो. राजन साळवींनी अनेक पदे भूषवली. किरण आणि उदय सामंत मला राजन साळवींना बोलवून तिकीट द्या असं सांगत होते. आमदार होण्याची संधी असतानाही किरण सामंत साळवींना तिकीट देण्याचा आग्रह धरत होते. काही गोष्टींसाठी योगायोग लागतो. ही शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आहे. इथं मालक आणि नोकर कुणी नाही. हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता म्हणूनच काम करत होतो. या पक्षामध्ये जो काम करेल तो पुढे जाईल," असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
"बाळासाहेब आपल्या सहकाऱ्यांना सवंगडी समजायचे. पण नंतर त्यांच्या पक्षात सहकाऱ्यांना नोकर, घरगडी अशी वागणूक देण्यात येऊ लागली. त्यामुळे मला अडीच वर्षांपूर्वी उठाव करावा लागला. गेल्या अडीच वर्षात आपण प्रचंड काम केलं. या राज्याला विकासाकडे नेलं. महाविकास आघाडीने बंद पाडलेले प्रकल्प पुढे नेले. इतिहासात नोंद होईल अशा प्रकारची कामं आम्ही केली. म्हणून अनेक लोक शिवसेनेमध्ये सामील झाले," असं एकनाथ शिंदे म्हणाले.
"ज्या पक्षाच्या विचारांना लागलीय वाळवी तिथे कसा राहील राजन साळवी. दिल्लीत मला शरद पवार यांच्या हस्ते पुरस्कार मिळाला. एका मराठी माणसाला दुसऱ्या मराठी माणसाने पुरस्कार दिल्याचा अभिमान पाहिजे. पण तुम्ही किती जळणार, तुमचा किती जळफळाट होणार आहे. तुम्ही माझी लाईन कापण्यापेक्षा तुमची लाईन वाढवा. लोकांमध्ये जा. पण घरी बसलेल्यांना लोक स्विकारत नाहीत हे विधानसभेला दाखवून दिलं आहे," असंही एकनाथ शिंदे म्हणाले.
अडीच वर्षांपूर्वी जाऊ शकलो नाही याचे दुःख - राजन साळवी
"धर्मवीर आनंद दिघे यांच्या अधिपत्याखाली एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व उभं राहिलं. जिल्हाप्रमुख झाल्यानंतर आनंद दिघे यांनी माझा सत्कार केला होता. त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी मला आपल्या परिवारात सामावून घेतलं. आज माझ्या दोन्ही डोळ्यात अश्रू आहेत. २०२२ पर्यंत एकनाथ शिंदे यांनी मला कुटुंबातील एक छोटा भाऊ म्हणून मार्गदर्शन केले. अडीच वर्षांपूर्वी जाऊ शकलो नाही याचे दुःख आहे. २०२४च्या निवडणुकीत मला पराभवाला सामोरं जावं लागलं," असं राजन साळवींनी म्हटलं.