प्रकाश परांजपे ज्येष्ठ पत्रकार
गेल्या वर्षी धुवांधार पावसाने सहा महिने या मुक्काम ठोकूनही शहापूर तालुक्याच्या दुर्गम भागात यंदा लवकरच पाणीटंचाईचे चटके जाणवू लागले आहेत. बोअरवेल, विहिरी यांसारखे जलस्रोत आटल्याने रणरणत्या उन्हात तप्त जमिनीवरून जंगलातील चढ-उताराच्या पायवाटेने महिला-भगिनींना घोटभर पाण्यासाठी मैलभर पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे वर्षाच्या सुरुवातीलाच टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असून, आजमितीस ५१ गावपाड्यांवर १४ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.
अडथळ्यांच्या शर्यतीत असलेली साडेतीनशे कोटींची भावली पाणी योजना व निधीअभावी जलजीवन मिशनची पाणी योजना रखडल्याने शासनाची 'हर घर नल से जल' ही घोषणा हवेतच विरली आहे. "जो तालुका मुंबईची तहान भागवतो, त्या शहापूरची तहान कधी भागणार?", हा प्रश्न मात्र कायम आहे. एकीकडे मुंबई महानगराला अखंड पाणीपुरवठा करणारे भातसा, तानसा आणि मोडकसागर ही मोठी धरणे शहापूर तालुक्यात असताना, "धरण उशाला आणि कोरड घशाला", अशी अवस्था आहे. त्यामुळे दुर्गम गावपाड्यांना आजही पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागते.
बोअरवेल, विहिरी, पाणी योजनांची दुरुस्ती आणि टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी दरवर्षी कोट्यवधींचा टंचाई आराखडा तयार करावा लागतो. मात्र, पाणीटंचाईमध्ये दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. यावर्षी देखील तब्बल तेरा कोटींचा टंचाई आराखडा मंजूर करण्यात आला असून, गतवर्षानुसार साधारणपणे तालुक्यातील किमान पावणेदोनशे गावपाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे अपेक्षित आहे. गेल्या पाच वर्षाच्या आकडेवारीवर नजर टाकली असता, दरवर्षी टँकरची संख्या व खर्चात सातत्याने चढ-उतार दिसतो. मात्र समस्या कायम आहे. २०२०-२१ ते २५-२६ या कालावधीत टँकरसाठी १७ कोटी खर्च झाला आहे.
धरण उशाला, कोरड घशाला...
"आमच्याकडे शेती आहे, जनावरं आहेत; पण पाणी नाही. टैंकरचं पाणी पिण्यासाठीच पुरतं, जनावरांना पाणी देणंही कठीण झालंय..." पोटासाठी मोलमजुरीकडे पाठ फिरवून रणरणत्या उन्हात महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे, असे उठावा येथील शेतकरी सखाराम वारे यांनी सांगितले. तर, दुसरे शेतकरी म्हणाले, "धरणं आमच्या डोळ्यासमोर आहेत, पण आमच्या शेताला पाणी मिळत नाही, हीच खरी शोकांतिका आहे.
Web Summary : Despite hosting dams supplying Mumbai, Shahapur faces severe water scarcity. Villagers rely on tankers as water schemes stall. Thirteen crore sanctioned for relief, but the problem persists, highlighting the irony of 'water at the head, dryness at the throat'.
Web Summary : मुंबई को पानी देने वाले बांधों के बावजूद शहापुर में पानी की भारी कमी है। जलापूर्ति योजनाएं रुकी होने से ग्रामीणों को टैंकरों पर निर्भर रहना पड़ता है। राहत के लिए तेरह करोड़ स्वीकृत, फिर भी समस्या बनी हुई है, 'सिर पर पानी, गले में सूखा' जैसी विडंबना।