कोरोनाच्या भीतीपोटी ग्राहकांची सलूनकडे पाठ; अनेकांमध्ये संभ्रम तर काहींनी केली दरवाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 03:41 AM2020-06-29T03:41:25+5:302020-06-29T03:41:35+5:30

‘लोकमत’चे प्रतिनिधी जितेंद्र कालेकर, अजित मांडके, प्रज्ञा म्हात्रे, अनिकेत घमंडी, मुरलीधर भवार, प्रशांत माने, धीरज परब, सदानंद नाईक आणि नितीन पंडित यांनी.

Customers turn to the salon for fear of corona; Confusion among many and price hike by some | कोरोनाच्या भीतीपोटी ग्राहकांची सलूनकडे पाठ; अनेकांमध्ये संभ्रम तर काहींनी केली दरवाढ

कोरोनाच्या भीतीपोटी ग्राहकांची सलूनकडे पाठ; अनेकांमध्ये संभ्रम तर काहींनी केली दरवाढ

Next

ठाणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तब्बल १०५ दिवसांनी ठाण्यासह राज्यभरात नाभिक व्यावसायिकांना आपली केशकर्तनालयाची दुकाने सुरु करण्यास राज्य सरकारने सशर्त परवानगी दिली. रविवारी कामाचा पहिलाच दिवस. गर्दी होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, अनेक ठिकाणी कोरोनाच्या भीतीने गिºहाइकांनीच पाठ फिरवली. काही ठिकाणी गिºहाइकांच्या अनेक प्रश्नांना उत्तरे देण्यात आणि अवजारांचे निर्जंतुकीकरण करण्यातच बहुतांश वेळ गेल्याने अनेकांच्या पदरी पहिल्याच दिवशी निराशा पडल्याचे चित्र ठाण्यात पाहायला मिळाले.

अनेक व्यावसायिकांची दुकाने नियमांचे पालन करीत १ जूनपासून सुरुही झाली होती; पण नाभिक समाजाला व्यवसायाची परवानगी नसल्याने नाराजी होती. आता सशर्त परवानगी मिळाली; पण पीपीई किट घाला, केस कटिंग करा, पण दाढीला हात लावू नका, अवजारांचे निर्जंतुकीकरण करा, अशा अनेक अटी घातल्यामुळे नेमका व्यवसाय करायचा तरी कसा, असा सवाल नाभिक व्यावसायिकांमधून उपस्थित होत आहे. ठाण्यात सुमारे पाच हजारांपेक्षा जास्त सलून व्यावसायिक आहेत. गेल्या अडीच-तीन महिन्यांमध्ये त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. जवळचे सर्व पैसे संपल्याने पीपीई किट, सॅनिटायझेशन किंवा अन्य बाबींसाठी लागणारी मोठी रक्कम कुठून आणायची? केस कर्तनासाठी १० ते ५० रुपयांची वाढ केली, तर ठरावीक लोक त्याचे स्वागत करतात. पण, अनेकजण नाक मुरडणारेही आहेत, असे यशोधननगर येथील व्यावसायिक पुरुषोत्तम खरे यांनी सांगितले. पीपीई किट घालून काम करणे मोठे जिकिरीचे असल्याचेही ते म्हणाले. पहिलाच दिवस, अगदी रविवार असूनही गिºहाईक नेहमीसारखे केस कटिंगसाठी फिरकलेच नाही. पुढे कसे होणार? पुन्हा लॉकडाऊन होते की काय? असे प्रश्न खरे यांच्या डोक्यात घरघर करत आहेत. कामापेक्षा अवजारांचे निर्जंतुकीकरण करण्यातच बराच वेळ गेल्याचेही ते म्हणाले.

लक्ष्मीपार्क परिसरातील सरताज शेख यांचा अनुभव काहीसा वेगळा होता. त्यांनी प्रोफेशनल व्यावसायिकाप्रमाणेच दुकानाच्या बाहेरच सॅनिटायझर ठेवले. चारपेक्षा अधिक गिºहाइकांना आत प्रवेश नाही. स्वत:ला मास्क आणि गिºहाइकांना नवे कोरे अ‍ॅप्रन दिले. अशा अनेक सोयी केल्याने केस कर्तनासाठी वाढीव दर आकारूनही गिºहाइकांनी स्वागत केले. तूर्त दाढी करण्याला परवानगी नाही, हे आमच्या आरोग्याच्या दृष्टीनेही योग्य असल्याचे ते म्हणाले.

पीपीई किट तसेच निर्जंतुकीकरणाचे नियम नाभिक व्यावसायिकांनाही आवश्यक आहे. परंतु, पीपीई किट कापडी आणि सुटसुटीत मिळावे. पी१ आणि पी२ मधून या व्यावसायिकांना वगळावे. दाढी करण्यालाही परवानगी मिळावी. व्यावसायिकांना शासनाने आर्थिक मदत करावी. - अरविंद माने, खोपट, ठाणे

अनलॉक-१ नंतर अनेक व्यवसायांना परवानगी देण्यात आली होती; मात्र सलून व्यावसायिकांना यातून वगळण्यात आले होते. त्यामुळे नाभिक समाजातून प्रचंड नाराजी व्यक्त होत असताना सरकारने रविवार, २८ जूनपासून सलून उघडण्यास परवानगी दिली. मात्र, कोरोनाच्या भीतीमुळे रविवार असूनही ग्राहकांनी फिरवलेली पाठ, विविध नियमांमुळे व्यावसायिकांची होत असलेली अडचण, दाढी करण्यास परवानगी नसल्याने ग्राहकांची नाराजी अशा नानाविध मुद्यांचा आढावा घेतला आहे,

९00 पैकी केवळ ६० दुकाने उघडली
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलून सुरु झाली असली तरी, ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याने अनेकांनी न जाणेच पसंत केल्याने डोंबिवलीत नाभिक समाजाच्या उत्साहावर पाणी फिरले. महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी, डीसीपी विवेक पानसरे यांनी शनिवारपासून कंटेनमेंट झोन लागू केल्याने पूर्वेला फार कमी सलून सुरु होते. पश्चिमेला तुलनेने जास्त दुकाने उघडली होती. सकाळी ९ वाजता दुकाने सज्ज झाली होती. डोंबिवली नाभिक महामंडळाने ठरवल्याप्रमाणे व्यावसायिकांनी सॅनिटायझर, मास्क, थर्मल स्क्रीनिंग, स्वत:च्या सुरक्षेसाठी फेस मास्क, पीपीई किट घातले होते. ग्राहकांना घालण्यात येणारे कापडही तयार ठेवण्यात आले होते. ग्राहकांचे स्वागत करून व्यवसायाला शुभारंभ केला. मात्र, जनजागृतीची आवश्यकता असल्याचे नाभिक महामंडळाचे बाळा पवार यांनी सांगितले. ते म्हणाले की, नागरिक कोरोनामुळे घाबरले असून केस कापायला येत नाहीत. ग्राहक येणार नसतील तर व्यवसाय सुरु करुन काय उपयोग? ग्राहकांनी जिथे विश्वास वाटेल तिथे सुविधा घ्यावी, त्यात काही त्रुटी असल्यास कळवावे, असे आवाहनही त्यांनी केले.

उल्हासनगरात झाले बहुतांश नियमांचे ‘कर्तन’
शहरातील बहुतांश सलून सुरु झाल्याने, पोटापाण्याचा प्रश्न सुटल्याचा आनंद व्यावसायिकांच्या चेहऱ्यावर होता. नागरिकांनीही समाधान व्यक्त केले. मात्र, व्यावसायिक पीपीई किट न घालता केस कापत असल्याचे चित्र शहरात दिसले. यातून कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. सकाळी ९ नंतर सलून सुरु होताच अनेकांनी केस कापण्यासाठी धाव घेतली. केस कापण्याच्या दरात दुप्पट वाढ होऊनही बहुतांश नागरिकांनी केस कापल्यावर एखाद्या संकटातून सुटका झाली, अशी प्रतिक्रिया दिली. काहींनी वाढलेल्या दरांबाबत नाराजी व्यक्त केली. सलूनचालकांनी केस कापताना पीपीई किट न घातल्याने केस कापण्यासही अनेकांनी नकार दिला. केस कापण्याचे साहित्य व वापरण्यात येत असलेले कापड सॅनिटाइझ केले जात असले, तरी ग्राहक व व्यावसायिकांच्या मनात कोरोनाची भीती कायम असल्याचे जाणवत होते. सरकारने व्यावसायिकांना पीपीई किट घालणे बंधनकारक केले आहे. मात्र बहुतांश दुकानदारांकडे ते नव्हते. अनेकांनी किट घातल्यावर गर्मी होत असल्याचा बहाणा सांगितला. अनेकांनी पीपीई किट विकत मिळाले नसल्याचे सांगितले.

भिवंडीकरांना ३ जुलैची प्रतीक्षा
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनलॉक काळातही सलून व्यवसाय बंद ठेवण्यात आला होता. नाभिक समाजाच्या मागणीनंतर सरकारने नियम व अटींवर रविवारी राज्यातील सलून सुरु करण्याची परवानगी दिली. मात्र, भिवंडीतील सलून व्यावसायिकांना आपली दुकाने सुरु करण्यासाठी ३ जुलैपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीने १८ जूनपासून शहरात १५ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद असल्याने शहरातील सलून दुकानेही बंदच होती.

Web Title: Customers turn to the salon for fear of corona; Confusion among many and price hike by some

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.