Cororn virus : मायदेशी परतण्याची आस, महाराष्ट्रातील तिघे तरुण इराणमध्ये बोटीवर अडकले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2020 18:30 IST2020-03-19T18:29:13+5:302020-03-19T18:30:08+5:30
किसननगरच्या तरुणाचाही समावेश, निरंजन डावखरे यांचे पंतप्रधानांना पत्र

Cororn virus : मायदेशी परतण्याची आस, महाराष्ट्रातील तिघे तरुण इराणमध्ये बोटीवर अडकले
ठाणे : `कोरोना'च्या संसर्गाच्या भीतीमुळे इराणमधील अबादान बंदरातील बोटीमधून बाहेर पडण्यास मज्जाव केल्यामुळे ठाण्यातील एका तरुणासह महाराष्ट्रातील तिघे जण बोटीवरच अडकले आहेत. या बोटीवरील अन्य देशांतील उर्वरित ३० कर्मचाऱ्यांची संबंधित देशांकडून सुखरुप सुटका करण्यात आली. दरम्यान, या तरुणांची सुटका करण्यात यावी, यासाठी भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठविले आहे.
आखातातील अमिर बोटीवर महाराष्ट्रातील विवेक विष्णू माळकर रा. किसननगर, सौरभ शशिकांत पिसाळ रा. भांडुप आणि अॅंथोनी जॉन पॉल रा. कोल्हापूर अशा तिघांसह ३३ कर्मचारी कार्यरत होते. इराणमध्ये कोरोनाचा फैलाव झाल्यानंतर अबादान बंदरातील बोटींवरील कर्मचाऱ्यांना बाहेर पडण्यास तडकाफडकी बंदी घालण्यात आली. त्यामुळे आठ दिवसांपासून अमिर बोट गोदीतच तळ ठोकून आहे. दरम्यानच्या काळात नौकेवरील ३० कर्मचाऱ्यांची संबंधित देशांकडून सुटका करण्यात आली. मात्र, आता भारतातील तिघे कर्मचारी अडकले आहेत. त्यात ठाण्यातील किसननगर, भांडूप आणि कोल्हापूरातील तरुणाचा समावेश आहे.
या तरुणांची बोटीतून सुटका करण्यासाठी इराणमधील भारतीय राजदूतांनी प्रयत्न करावेत, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याकडे भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी केली आहे. दरम्यान, किसननगरमधील तरुणांच्या पालकांची निरंजन डावखरे यांनी आज भेट घेतली. तसेच त्यांना दिलासा दिला. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनाही पत्र पाठवून विवेक माळकर यांच्या कुटुंबियांनी मदतीची विनंती केली आहे.