Coronavirus: कोरोनाने मला काय शिकवले? कमी पैशांत घर कसं चालवायचं ते शिकवलं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 23:52 IST2021-03-22T23:52:25+5:302021-03-22T23:52:40+5:30
मागील वर्षांपूर्वी कोरोनाची साथ आली आणि सक्तीने लॉकडाऊन झाला. तातडीच्या सेवांव्यतिरिक्त सगळं बंद झालं. स्वतःला घरात बंदिस्त करून घ्यायचं. ...

Coronavirus: कोरोनाने मला काय शिकवले? कमी पैशांत घर कसं चालवायचं ते शिकवलं
मागील वर्षांपूर्वी कोरोनाची साथ आली आणि सक्तीने लॉकडाऊन झाला. तातडीच्या सेवांव्यतिरिक्त सगळं बंद झालं. स्वतःला घरात बंदिस्त करून घ्यायचं. संपूर्ण जग स्तब्ध झाल्यासारखं वाटत होतं. विनाकारण केल्या जाणाऱ्या खर्चाला खीळ बसली आणि महत्त्वाचं म्हणजे कमी पैशातही घर चालवता येऊ शकतं हा धडा या कोरोनामुळे मिळाला.
या काळात प्रत्येकाला बरे-वाईट अनुभव आले. लोकांनी एकत्र कुटुंबातील सर्वच सदस्यांसोबत राहून तणावमुक्त आनंदी जीवनाचा अनुभव घेतला. कुटुंबातील सदस्यांनी कोणत्याही परिस्थितीत एकत्र असावं, याची जाणीव लॉकडाऊनमध्ये झाली. आम्हाला एकत्र असण्याचा खूप फायदा झाला. त्यामुळे बंदीच्या काळातही कशाचीच कमतरता भासली नाही. उलट आपलं घर सोडून रोजगारासाठी दूर शहरात राहणाऱ्या लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलं.
मदतीला येईल असं कोणीही जवळचा माणूस नाही, त्यामुळे एकटेपणा जास्त जाणवला. या लॉकडाऊनमध्ये आम्ही बरीच पुस्तकं वाचली.
नियमितपणे केलेल्या वाचनामुळे ज्ञानात भर पडली. शिवाय पुस्तकांसोबत वेळ कसा गेला ते कळलंच नाही. कोरोनाने गरीब-श्रीमंत, काळा-गोरा अशा प्रत्येकाला स्वच्छता आणि निरोगी जीवन कसं जगायचं हे शिकविलं. - दादासाहेब येंधे, मुंबई
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी गेल्या वर्षी २३ मार्चपासून लॉकडाऊन झाला. २२ मार्चला जनता कर्फ्यू लागू केला. याला एक वर्ष पूर्ण झाले. लॉकडाऊनमुळे संचारबंदी लागू झाली. रस्ते ओस पडले... आणि सुरू झाला संघर्ष. या काळात आलेले अनुभव ‘लोकमत’च्या वाचकांनी मांडले.