CoronaVirus News: राष्ट्रवादीच्या नेत्याच्या कुटुंबावर शोककळा; महिन्याभरात तीन सदस्यांवर कोरोनाचा घाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2020 16:10 IST2020-08-24T16:09:36+5:302020-08-24T16:10:10+5:30
तिघांच्या मृत्यूमुळे कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

CoronaVirus News: राष्ट्रवादीच्या नेत्याच्या कुटुंबावर शोककळा; महिन्याभरात तीन सदस्यांवर कोरोनाचा घाला
भिवंडी: जगभर थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव भिवंडीतही वाढला आहे. सध्या रुग्ण बरे होण्याचा वेग वाढला असला तरी कोरोनाने भिवंडीतील वडूनवघर येथील चौघुले परिवारावर घाला घातला आहे. एका महिन्याच्या आत परिवारातील तीन सदस्यांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
मागील महिन्यात 25 जुलै रोजी चौघुले परिवारातील जैष्ठ सदस्य व ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते महादेव बाबुराव चौघुले (76) यांचे कोरोनाने निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर अवघ्या 23 दिवसांनी त्यांचे छोटे बंधू पंडित बाबुराव चौघुले (68) यांचे देखील कोरोनावरील उपचारादरम्यान खासगी रुग्णालयात निधन झाले. या दोन मृत्यूंमुळे चौघुले परिवारावर शोककळा पसरली.
यानंतर महादेव चौघुले यांच्या पत्नी पार्वतीबाई महादेव चौघुले (70) यांना देखील कोरोनाची लागण झाली. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. विशेष म्हणजे रविवारी त्या कोरोना मुक्त झाल्या असल्याने त्यांना सोमवारी रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार होते. मात्र सोमवारी घरी सोडण्याआधीच त्यांना हृदय विकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला.
45 जणांचा एकत्रित परिवार असल्याने तालुक्यातील एकत्र कुटुंब पद्धतीचे आदर्श असलेल्या या परिवारावर कोरोनाने घाला घातल्याने एकाच महिन्यात तीन सदस्यांचा कोरोनाने मृत्यू झाल्याने चौघुले परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पार्वतीबाई चौघुले यांच्या निधनाने सामाजिक, राजकीय व शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले व तीन विवाहित मुली , नातवंडे ,पतवंडे असा मोठा परिवार आहे.