CoronaVirus News in Thane : भिवंडी ते वाराणसी ६० तासांचा खडतर प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2020 23:58 IST2020-05-20T23:56:46+5:302020-05-20T23:58:25+5:30
CoronaVirus News in Marathi and Live Updates : घरी पोहोचल्याचा आनंद असला, तरी होम क्वारंटाइनमुळे २१ दिवस कुटुंबीयांपासून विलग राहावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

CoronaVirus News in Thane : भिवंडी ते वाराणसी ६० तासांचा खडतर प्रवास
- आमोद काटदरे ।
ठाणे : लॉकडाउनमुळे अडकलेले डोंबिवलीतील सलून कारागीर शशिकांत शर्मा व भिवंडीतील नोकरदार संतोष शर्मा हे भिवंडी बायपास येथून टप्प्याटप्प्याने १,४०० किमीपेक्षा अधिक अंतराचा एसटीचा खडतर प्रवास करून ६० तासांनी वाराणसी येथे पोहोचले आहेत. घरी पोहोचल्याचा आनंद असला, तरी होम क्वारंटाइनमुळे २१ दिवस कुटुंबीयांपासून विलग राहावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शशिकांत यांनी गावी जाण्यासाठी प्रक्रिया पूर्ण केली. मात्र, ट्रेन कधी सुटेल, याची हमी मिळत नसल्याने त्यांनी १५ मे रोजी रात्री ट्रकने गाव गाठण्याचे ठरवले. मात्र, ट्रक न आल्याने त्यांनी नातेवाईक संतोष यांच्यासह भिवंडी बायपास येथे रात्री मुक्काम केला. १६ मे रोजी सकाळी ते एसटी बसच्या रांगेत उभे राहिले. उकाड्यामुळे जीव कासावीस होत असताना दानशूरांनी दिलेले पाणी, खाद्यपदार्थांमुळे दिलासा मिळाल्याचे ते म्हणाले. नाव व आधारनोंदणीनंतर त्यांच्यासह २६ जणांना पाणी, मास्क, खाद्यपदार्थ देऊन मध्य प्रदेशच्या सीमेपर्यंत जाणाऱ्या बसमध्ये बसवण्यात आले. दुपारी २.३० वा. सुटलेली ही बस वाटेत एक-दोन वेळा चहा-पाण्यासाठी थांबली. सीमेपासून ९० किमी अलीकडे रात्री एका ठिकाणी ढाब्यावर त्यांना मोफत जेवण मिळाले. तेथून सुरू झालेला प्रवास मध्यरात्री १.४० वाजता संपला. सीमा भागातील दुर्गा मंदिरात रात्रभर मुक्काम केला. तेथे अंघोळ, नाश्त्याची विनाशुल्क व्यवस्था होती, असे त्यांनी सांगितले.
मध्य प्रदेशातील प्रवासाचा दुसरा टप्पा होता. १७ मे रोजी देवासकरिता सकाळी १०.४५ वा. बस मिळाली. पोलीस प्रत्येकाला सुरक्षित अंतर ठेवून एसटीत बसवत होते. बसमध्ये पाणी, बिस्किटे, खिचडी देण्यात आली. कंडक्टरने प्रत्येकाची नाव व आधारनोंदणी करून घेतली. ही बस दुपारी ३.४० ला देवासला पोहोचली. तेथून गुनाकरिता तिसºया टप्प्याचा २४५ किमीचा प्रवास सुरू झाला. रात्री १०.३० वाजता ही बस पोहोचली.
गुना येथून १७ मे रोजी रात्री ११.३० ला उत्तर प्रदेशातील सीमेनजीकच्या झांसीकरिता चौथ्या टप्प्याचा प्रवास सुरू झाला. मात्र, या प्रवासात खूपच गर्दी होती. एका बसमध्ये जवळपास ४० जण होते. झांसीला १८ मे रोजी पहाटे ३.४० वाजता ते पोहोचले. तेथील गर्दीत रुग्ण असल्याचे नोटिफिकेशन आरोग्य सेतू अॅपवर येत होते. त्यामुळे धडधड वाढल्याचे शर्मा म्हणाले. झांसी ते वाराणसी हा ५०० हून अधिक किमीचा प्रवास होता. १८ मे रोजी सकाळी ८.४० वा. सुटलेली बस रात्री १०.३० ला वाराणसीला पोहोचली. तेथे वैद्यकीय चाचणीअंती होम क्वारंटाइनचा सल्ला देण्यात आला. या चाचणीनंतर १९ मे रोजीच्या पहाटे २ ला शशिकांत कठिराओ या खेडेगावी जाण्यासाठी पिंड्रामार्गे रवाना झाले. पावणेतीन वाजता पिंड्रा गाठल्यानंतर तेथून ते ४.३० ला भावाच्या दुचाकीने गावी पोहोचले. तर, संतोष हे वाराणसीहून खाजगी बसने जौनपूरला आपल्या गावाकडे रवाना झाले.
बिहार, झारखंडचेही प्रवासी : बिहारला जाणारे काही प्रवासी गोरखपूरहून लखनऊमार्गे रवाना झाले. तसेच बिहार आणि झारखंडच्या काही प्रवाशांना वाराणसीहून प्रशासनाने खाजगी बस, ट्रकमधून पाठवण्यात आले. उत्तर प्रदेशातून पायी जाणाऱ्यांनाही पोलिसांनी ठिकठिकाणी रोखून बसने रवाना केले. तसेच सीमा भागात ट्रकचालकांना रोखले जात होते, असे शर्मा म्हणाले.
कल्याण ते वाराणसीपर्यंतचा रेल्वेचा प्रवास २७ तासांचा असतो. महाराष्ट्र व मध्य प्रदेश सरकारच्या एसटीमुळे टप्प्याटप्प्याने आम्ही ६० तासांनी आमच्या घरी सुखरूप पोहोचलो. या प्रवासात आम्हाला आमच्याच उत्तर प्रदेश प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा फटका बसला. तसेच जेवणखाणे, पाणीही जादा पैसे मोजून विकत घ्यावे लागले. - शशिकांत शर्मा