CoronaVirus News in Kalyan Dombivali : फाइल हरवल्याने आजीबाई २७ दिवस रुग्णालयात कैद!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2020 00:47 IST2020-05-22T00:47:23+5:302020-05-22T00:47:44+5:30
CoronaVirus News in Marathi and Live Updates : कोरोनाच्या चाचणीत आजीसह त्यांची ३५ वर्षीय सून आणि सात वर्षीय नात या तिघींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने ४ एप्रिलला तिघींनाही मुंबईतील सरकारी रूग्णालयात दाखल करण्यात आले.

CoronaVirus News in Kalyan Dombivali : फाइल हरवल्याने आजीबाई २७ दिवस रुग्णालयात कैद!
- प्रशांत माने
डोंबिवली : पूर्वेत राहणाऱ्या ७४ वर्षीय आजींना कोरोना झाल्याने मुंबईतील एका सरकारी रूग्णालयात उपचाराकरिता दाखल केले होते. अकरा दिवसांचे उपचार घेतल्यानंतर त्यांना घरी नेण्याकरिता डोंबिवलीतून रुग्णवाहिका आली होती. मात्र, त्यांची वैद्यकीय फाइलच मधल्या काळात गहाळ झाल्याने त्यांचा रुग्णालयातील मुक्काम थोडाथोडका नव्हे तब्बल २७ दिवस लांबला. यामुळे त्यांना प्रचंड मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले.
कोरोनाच्या चाचणीत आजीसह त्यांची ३५ वर्षीय सून आणि सात वर्षीय नात या तिघींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने ४ एप्रिलला तिघींनाही मुंबईतील सरकारी रूग्णालयात दाखल करण्यात आले. आजींना वृद्धांसाठी राखीव असलेल्या विभागात ठेवण्यात आले, तर सून आणि नातीला एकाचा कक्षात ठेवण्यात आले. पाच दिवसांनंतर सून आणि नातीला लीलावती रुग्णालयाच्या परिसरातील सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले. आजींची प्रकृती व्यवस्थित होती. पाच ते सहा वेळा टेस्टिंंगसाठी स्वॅब घेण्यात आले. अकराव्या दिवशी तुम्हाला डिस्चार्ज दिला जातोय, असे सांगण्यात आले. मात्र, अचानक माझ्या रिपोर्टबाबत काही शंका आल्याने डॉक्टरांनी डिस्चार्ज देण्यास नकार दिला. त्यामुळे घरी घेऊन जाण्यासाठी बोलावण्यात आलेली केडीएमसीची रुग्णवाहिका ऐनवेळी रद्द केली. दुसºया दिवशी पुन्हा स्वॅब घेण्यात आला. तो रिपोर्ट निगेटिव्ह आला. त्याचदिवशी आजींची रिपोर्ट फाइल डॉक्टरांकडे गेली असती तर त्यांना डिस्चार्ज मिळाला असता. परंतु, तसे झाले नाही. आजींना डिस्चार्ज दिला नसतानाही तेथील रजिस्टरमध्ये डिस्चार्ज दिल्याची नोंद केली गेली. केडीएमसीलाही आजीचा डिस्चार्ज झाल्याचे कळवण्यात आले. आपला रिपोर्ट निगेटिव्ह येऊनही घरी का सोडत नाही, या शंकेमुळे आजींनी फाइल दाखवण्याचा आग्रह केला. मात्र, आजींना ना फाइल दाखवण्यात आली ना डिस्चार्ज दिला गेला. फाइल सापडत नसल्याचे कारण आजींना दिले जात होते. २७ दिवस इस्पितळात काढल्यावर आजींनी डीनकडे तक्रार करण्याची धमकी दिल्यावर तत्काळ सूत्रे हलली आणि गहाळ झालेली फाइल सापडली.
- डोंबिवली पूर्वेतील या वृद्ध महिलेची नात आणि सुनेच्या रिपोर्टमध्येही घोळ आल्याने त्यांनाही नाहक मनस्ताप सोसावा लागला. त्यामुळे त्यांचाही प्रवास आजींप्रमाणे लांबला. रक्तदाबाचा त्रास असलेल्या आजींनी कसेबसे घर गाठल्यानंतर हा प्रवास स्वत: कथन केला. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रूग्णालय प्रशासनावरील ताण वाढल्याने हा प्रकार घडला असेल, असे त्या म्हणतात.