CoronaVirus News in Kalyan Dombivali : कोरोनाग्रस्ताला चालत येण्याचा सल्ला, प्रशासनाच्या हलगर्जीबद्दल संताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2020 00:50 IST2020-05-22T00:49:38+5:302020-05-22T00:50:19+5:30
CoronaVirus News in Marathi and Live Updates : मुंबईतील वाडिया रुग्णालयात वॉर्डबॉयचे काम करणारा हा तरुण डोंबिवलीतील गोपाळ भवन येथे राहतो. त्याला कोरोनाची लक्षणे दिसू लागल्याने त्याची मुंंबईच्या रुग्णालयात टेस्ट करण्यात आली.

CoronaVirus News in Kalyan Dombivali : कोरोनाग्रस्ताला चालत येण्याचा सल्ला, प्रशासनाच्या हलगर्जीबद्दल संताप
कल्याण : डोंबिवलीत एका तरुणाला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आल्याने त्याने स्वत:हून महापालिकेच्या शास्त्रीनगर कोरोना रुग्णालयाशी संपर्क साधला. मात्र, रुग्णालयाने रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने चालत येण्याचा सल्ला दिला. अखेर, तरुणाने पायपीट करीत रुग्णालय गाठले. तेथे तीन तास त्याला बसवून ठेवल्यावर दुपारी भिवंडी बायपास येथील कक्षात दाखल केले. त्याच्या मदतीला काही कार्यकर्ते धावून आल्याने त्याला धीर मिळाला. मात्र, या घटनेतून महापालिकेचा निष्काळजीपणा उघड झाल्याने त्याच्या नातलगांनी निषेध केला आहे.
मुंबईतील वाडिया रुग्णालयात वॉर्डबॉयचे काम करणारा हा तरुण डोंबिवलीतील गोपाळ भवन येथे राहतो. त्याला कोरोनाची लक्षणे दिसू लागल्याने त्याची मुंंबईच्या रुग्णालयात टेस्ट करण्यात आली. बुधवारी सायंकाळी त्याच्या वैद्यकीय अहवाल प्राप्त झाला. त्याला कोरोना झाल्याने गुरुवारी सकाळी ८ वाजता त्याने डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयास संपर्क साधला व रुग्णवाहिका पाठवण्याची विनंती केली. रुग्णालयाने साडेअकरा वाजेपर्यंत रुग्णवाहिका पाठविली नाही. त्यामुळे रुग्णाने प्रभागातील सामाजिक कार्यकर्ते बाळा म्हात्रे यांच्याशी संपर्क साधला. म्हात्रे यांनी रुग्णालयाशी संपर्क साधून रुग्णवाहिका पाठवण्याची विनंती केली. त्यावेळी डॉक्टरांनी त्याला चालता येत असल्यास रुग्णालयात चालत येऊ द्या, असा उफराटा सल्ला दिला. म्हात्रे यांनी वकील गणेश पाटील, संदीप सामंत, मनोज वैद्य, राजा चव्हाण, युगेश भोईर यांना सोशल डिस्टन्सिंग राखून रुग्णासोबत रुग्णालयात जाण्यास सांगितले. तब्येत बरी नसतानाही स्वत: वैद्यकीय कर्मचारी असलेला हा तरुण चालत रुग्णालयात पोहोचला. मात्र, त्याला रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरील सुरक्षारक्षकाने आत घेतले नाही. बाहेर थांबवून ठेवले. पायपीट करून आलेल्या रुग्णाला रुग्णालयाबाहेर तब्बल तीन तास ताटकळत ठेवल्यावर अखेरीस दुपारी ३ वाजता रुग्णवाहिकेतून भिवंडी बायपास येथील टाटा आमंत्रण येथे भरती केले.
चारही रुग्णवाहिका रुग्णकार्यात व्यस्त
यासंदर्भात रुग्णालय प्रशासनाने सांगितले की, रुग्णालयात चार रुग्णवाहिका आहेत. ज्यावेळी रुग्णालयात रुग्णाने रुग्णवाहिकेसाठी फोन केला, तेव्हा या चारही रुग्णवाहिका अन्य ठिकाणी रुग्णांना घेण्यासाठी गेल्या होत्या. त्यामुळे ११ वाजता रुग्णवाहिका पाठविली जाईल, असे सांगितले होते.