Coronavirus News: ‘ठाण्यातील स्मशानभूमीतील विद्युत दाहिनीच्या चिमणीची उंची वाढवा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 21:28 IST2020-06-19T21:21:57+5:302020-06-19T21:28:27+5:30
ठाण्यातील स्मशानभूमीतील दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झालेली असतांनाच आता या ठिकाणच्या धूराचा सामनाही स्थानिक रहिवाशांना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर जवाहरबाग स्मशानभूमीतील विद्युत दाहिनीच्या चिमणीची उंची वाढविण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी महापौर नरेश म्हस्के यांच्याकडे केली आहे.

मनसेचे ठाण्याच्या महापौरांना साकडे
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: सध्या ठाण्यात कोवीड तसेच अन्य कारणाने मृत्यू पावलेल्यांच्या मृतदेहांवर जवाहरबाग स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातात. या स्मशानभूमीतील विद्युत दाहिनीच्या चिमणीची उंची कमी असून ती वाढविण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी महापौर नरेश म्हस्के यांच्याकडे केली आहे.
मोरे यांनी महापौरांना दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २१ मधील जवाहरबाग या गजबजलेल्या मार्केट परिसरामध्ये हिंदू धर्माची स्मशानभूमी आहे. या स्मशानभूमीतील विद्युतदाहिनीचा धूर बाहेर फेकणा-या चिमणीची उंची हा फार कमी आहे. त्यामुळे त्यातून निघालेला धूर, धूळ आणि राख आदी घटक हे आजूबाजूला असलेल्या रस्त्यावर तसेच घरांमध्ये हवेमार्फत उडून भोवतालच्या परिसरात पसरत आहेत. ठाण्यात कोवीडसह अन्यही कारणाने मृत्यु पावलेल्या व्यक्तिींवर याच स्मशानभूमीत दररोज मोठया प्रमाणात अंत्यसंस्कार केले जात आहेत. त्यामुळे सभोवताली धूळ आणि धूराचेही साम्राज्य पसरते. या प्रकारामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले असून त्यांना या धूराचा सामना करावा लागू नये म्हणून त्यांची दारे, खिडक्या नेहमीच बंद ठेवाव्या लागतात. कोवीड बाधित मृतांच्या वाढत्या संख्येमुळे तर अंत्यसंस्कारासाठी या स्मशानभूमीच्या समोरील रस्त्यावर रूग्णवाहिका एकामागून एक रांगेत उभ्या असल्याचे चित्र स्थानिकांना रोज पहायला मिळते. या धुरामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने तात्काळ या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन या विद्युत दाहिनीच्या धूर बाहेर फेकणाºया मार्गाची (चिमणी) उंची वाढवावी, अशी मागणी मनसेचे मोरे यांनी केली.