CoronaVirus News : लसीकरणासाठी ८५० केंद्रांची सोय, टास्क फोर्सची बैठक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2020 00:17 IST2020-12-23T00:16:40+5:302020-12-23T00:17:03+5:30
CoronaVirus News in Thane : लसीकरणाचा कार्यक्रम राबविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पूर्वतयारी सुरू केली असून, पहिल्या टप्प्यात आरोग्य यंत्रणेतील कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्याचा समावेश आहे.

CoronaVirus News : लसीकरणासाठी ८५० केंद्रांची सोय, टास्क फोर्सची बैठक
ठाणे : जिल्ह्यात कोरोनावर मात करण्यासाठी जिल्ह्यात सुमारे ८५० लसीकरण केंद्रांची सोय केली असून, तेथे दर दिवशी १०० लस देण्याचे नियोजन केले आहे. यानुसार, एका दिवशी आठ हजार ५०० जणांना लस देण्यात येणार असल्याचे ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सोमवारी सांगितले.
पहिल्या टप्प्यात आरोग्य यंत्रणेतील कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात येईल. जिल्ह्यातील या लसीकरणासाठी शीतसाखळी तयार केली असून, तीत प्लस दोन ते प्लस आठ डिग्री सेल्सिअस तापमानात ही लस ठेवण्यात येणार. यासाठी आइसलाइंड रेफ्रिजरेटर (आयएलआर) तयार ठेवण्यात आले आहेत. या आयएलआरचे तापमान दोन ते आठ डिग्री सेल्सिअस एवढे असून, त्यात ती ठेवण्यात येणार आहे. जिल्ह्यात १९० आयएलआर आहेत.
लसीकरणाचा कार्यक्रम राबविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पूर्वतयारी सुरू केली असून, पहिल्या टप्प्यात आरोग्य यंत्रणेतील कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्याचा समावेश आहे. त्यासाठी लस उपलब्ध होताच, तातडीने मोहिमेला सुरुवात करण्यात येणार असल्याचे नार्वेकर यांनी सांगितले. यासाठी त्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील कोरोना लसीकरण टास्क फोर्स समितीच्या आढावा घेतला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.कैलास पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मनिष रेंघे, डॉ.विना जळगावकर, जिल्ह्यातील सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
डीपफ्रीजरची व्यवस्था
जिल्ह्यातील ६६ हजार ४४७ जणांनी लसीकरणासाठी नोंदणी केली आहे. कोरोनाची लस ठेवण्यासाठी जिल्ह्यात १९७ डीपफ्रीजरची व्यवस्था आहे, तसेच एकूण कोल्ड बॉक्स १९९ असून, २६ हजार ५३० आइस पॅक उपलब्ध आहेत. याबरोबरच जिल्ह्यात चार हजार ८१४ वॅक्सिन कॅरियर असणार आहेत, तर ८४६ वॅक्सिनेटर, ३४० पर्यवेक्षक तैनात आहेत.