Corona virus News: ठाण्यातील ग्लोबल हॉस्पिटलच्या आयसीयू बेडसाठी दीड लाख रुपये घेणाऱ्या डॉक्टरला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2021 00:05 IST2021-04-23T23:59:50+5:302021-04-24T00:05:40+5:30
महापालिकेच्या ग्लोबल रुग्णालयात अतिदक्षता विभागामध्ये (आयसीयू) कोरोना रुग्णाला दाखल करण्यासाठी दीड लाख रुपये घेतल्याच्या प्रकरणामध्ये डॉ. परवेझ शेख (४२, रा. बांद्रा, मुंबई) याला कापूरबावडी पोलिसांनी शुक्रवारी पहाटेच्या सुमारास अटक केली आहे.

डॉक्टरसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : महापालिकेच्या ग्लोबल रुग्णालयात अतिदक्षता विभागामध्ये (आयसीयू) कोरोना रुग्णाला दाखल करण्यासाठी दीड लाख रुपये घेतल्याच्या प्रकरणामध्ये डॉ. परवेझ शेख (४२, रा. बांद्रा, मुंबई) याला कापूरबावडी पोलिसांनी शुक्रवारी पहाटेच्या सुमारास अटक केली आहे. त्याला २८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. शेखसह पाच जणांविरुद्ध याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या सूचनेनुसार हा गुन्हा २३ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास दाखल करण्यात आला. ठाणे महापालिकेच्या या कोविड सेंटरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांना मोफत उपचार देण्यात येत आहेत. रुग्णांना आवश्यकतेनुसार आयसीयू आणि ऑक्सिजन बेड उपलब्ध करून देण्यात येतात. तरीही या रुग्णालयात रुग्णाला दाखल करण्यासाठी दीड लाख रुपये घेतल्याचा आरोप वसईतील एका रुग्णाच्या नातेवाइकांनी केला होता. खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करून न घेतल्याने ठाण्यातील या ग्लोबल रुग्णालयात दाखल करून देतो, असे सांगून रुग्णांच्या नातेवाइकांकडे दीड लाख रुपयांची मागणी केली होती. समाजमाध्यमांतून या देवाणघेवाणीची चित्रफीत गुरुवारी व्हायरल झाली. त्यानंतर मनसेचे ठाणे आणि पालघर जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी पालिका प्रशासनाकडे गुरुवारी केली. याची गांभीर्याने दखल घेत महापौर म्हस्के यांनी संबंधित प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर महापालिकेच्या वतीने उपायुक्त विश्वनाथ केळकर आणि डॉ. अविनाश माळगावकर यांनी कापूरबावडी पोलीस ठाण्यात फसवणूक तसेच खंडणीचा गुन्हा दाखल केला. यामध्ये मे.ओमसाई आरोग्य केअर प्रा.लि. या खासगी कंपनीत सल्लागार असलेला डॉ. परवेझ तसेच नाझनीन, अबिद खान, ताज शेख आणि अब्दुल खान अशा पाच जणांचा कथित आरोपींमध्ये समावेश आहे.
काय घडला प्रकार?
डॉ. परवेझ याच्यासह पाचही आरोपींनी आपसात संगनमत करून दोन कोरोनाग्रस्त रुग्णांच्या नातेवाइकांकडे ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यासाठी २२ एप्रिल रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास दीड लाखांची मागणी करून ते स्वीकारले. डॉ. परवेझ यांनी नियमबाह्यपणे रुग्णाला याठिकाणी प्रवेश दिला. त्यांचा यात कशा प्रकारे सहभाग आहे, याचा तपास सुरू आहे. मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालय येथे अबीद या रुग्णवाहिका चालकाने रुग्णाच्या मुलाला ग्लोबलसाठी ताज शेखला भेटण्यास सांगितले. त्यानंतर ताज आणि अब्दुल या दोघांकडे ही दीड लाखांची रक्कम रुग्णाच्या नातेवाइकांनी सुपूर्द केल्याचा आरोप आहे.