Pratap Sarnaik on Marathi Ekikarn Committee: मीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीनंतर शहरातील राजकारण मराठीमहापौर या मुद्द्यावरून कमालीचे तापले आहे. आज भाजपकडून डिंपल मेहता या महापौरपदाचा पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे. मात्र, या निवडीला मराठी एकीकरण समिती, मनसे आणि इतर स्थानिक संघटनांनी तीव्र विरोध दर्शवला असून शहरात आंदोलनाचे पडसाद उमटत आहेत.
मराठी एकीकरण समितीने आज सकाळी १० वाजता सुभाषचंद्र बोस मैदान ते महापालिका असा मोर्चा काढण्याचे जाहीर केले आहे. या मोर्चाला पोलिसांनी अद्याप परवानगी दिलेली नाही. उलट, पोलिसांनी आंदोलकांना नोटिसा बजावल्या असून आंदोलन केवळ मैदानापुरतेच मर्यादित ठेवावे, अशा सूचना दिल्या आहेत. तरीही, आम्ही महापालिकेपर्यंत जाणारच असा ठाम पवित्रा समितीने घेतला.
"मराठी महापौरच हवा"; आंदोलकांची मागणी
मीरा-भाईंदर हे आगरी-कोळ्यांचे शहर आहे, अशी भूमिका मांडत आंदोलकांनी मराठी महापौर बसवण्याची मागणी लावून धरली आहे. जर डिंपल मेहता यांनी पदभार स्वीकारला, तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. मीरा-भाईंदरला पहिला अमराठी महापौर मिळण्याच्या शक्यतेमुळे मराठी समाजात संतापाची लाट उसळली आहे.
प्रताप सरनाईक यांचा आंदोलनावर निशाणा
या संपूर्ण वादावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कडक शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. हे आंदोलन एखाद्या विशिष्ट पक्षाला फायदा करून देण्यासाठी केले जात असल्याचा आरोप प्रताप सरनाईक यांनी केला. या आंदोलनात सामान्य मराठी माणसाला ओढणे पूर्णपणे अयोग्य असल्याचे सरनाईक म्हणाले. तसेच मीरा-भाईंदरमध्ये हिंदी भाषिक ८२ टक्के असून मराठी भाषिक केवळ १८ टक्के असल्याचे प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
“हा भाजपचा अंतर्गत प्रश्न आहे. कुणाच्या कुठल्या नातेवाईकाला महापौर करायचं हा त्यांचा प्रश्न आहे. प्रामुख्याने मीरा भाईंदरमध्ये हिंदी भाषिक हे ८२ टक्के आहेत. आणि मराठी भाषिक १८ टक्के आहे. ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. पण वैयक्तिक हेतूने प्रेरित होऊन मराठी एकीकरण समिती जर त्यांच्या कार्यालयातून ठाकरे गट आणि मनसेचे एबी फॉर्म वाटणाऱ्या एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या फायद्यासाठी काम करत असेल, तर ते चुकीचे आहे. अशा व्यक्तीकडे आंदोलनाचे नेतृत्व सोपवून त्यात सामान्य मराठी माणसाला ओढणे ही भूमिका अयोग्य आहे. आता निवडणुका झाल्या आहेत आणि त्याचे बहुमत आलं आहे. त्यामुळे त्यांनी कुणाला महापौर करावं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, असं सरनाईक यांनी म्हटलं.
"आमचे २८ उमेदवार हे मराठी एकीकरण समितीने ठाकरे गट आणि मनसेला दिलेल्या बळामुळे पडले. एखाद्या राजकीय पक्षाला फायदा होण्यासाठी हा प्रयत्न सुरु आहे. ज्यावेळी नरेंद्र मेहता दुसऱ्यांदा आमदार झाले तेव्हा यांनी आंदोलन का नाही केले. त्याच लोकांनी खासदार किंवा आमदार हिंदी भाषिक हवा अशी भूमिका घेतली तर तुम्ही काय करणार. त्यामुळे एका राजकीय पक्षासाठी ते आंदोलन करत आहेत आणि त्यांना अर्थसहाय्य पुरवले जात आहे,” असं प्रताप सरनाईक म्हणाले.
Web Summary : Pratap Sarnaik criticizes Marathi Ekikaran Samiti's protest against a non-Marathi mayor in Mira-Bhayandar, alleging political motives and external support. He highlights the city's demographic split, with 82% Hindi speakers, suggesting the protests serve specific party interests.
Web Summary : प्रताप सरनाईक ने मीरा-भायंदर में गैर-मराठी महापौर के विरोध पर मराठी एकीकरण समिति की आलोचना की, राजनीतिक उद्देश्यों और बाहरी समर्थन का आरोप लगाया। उन्होंने शहर के जनसांख्यिकीय विभाजन पर प्रकाश डाला, जिसमें 82% हिंदी भाषी हैं, यह सुझाव देते हुए कि विरोध विशिष्ट पार्टी हितों की सेवा करता है।