ठाण्यात १,२१० घरांमध्ये आढळले दूषित पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 23:46 IST2020-11-26T23:46:38+5:302020-11-26T23:46:57+5:30
मनपाची मोहीम : ३२,६५० घरांची तपासणी

ठाण्यात १,२१० घरांमध्ये आढळले दूषित पाणी
ठाणे : शहरात कोरोनाचा संसर्ग कमी होत असला, तरी डेंग्यू व मलेरियाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी संशयित रुग्णांची योग्य तपासणी तसेच नियमित औषधफवारणी मोहीम महानगरपालिकेने हाती घेतली आहे. यात दोन हजार ५३ ठिकाणी औषधफवारणी आणि २१ हजार ८८५ ठिकाणी धूरफवारणी केली आहे. शहरात एकूण ३२ हजार ६५० घरांची तपासणी केली असून यापैकी एक हजार २१० घरांमध्ये दूषित पाणी आढळले. , ४९ हजार ७२६ कंटेनरची तपासणी केली असता एक हजार १९७ कंटेनरमध्ये दूषित पाणी आढळले आहेत. त्या सर्व दूषित कंटेनरमध्ये महापालिकेने अळीनाशक औषधफवारणी केली आहे.
महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या सूचनेनुसार ही मोहीम हाती घेतली आहे. सद्य:स्थितीत कोरोनाचा संसर्ग कमी होत आहे. डेंग्यू व मलेरिया या आजारांचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने विशेष काळजी घेण्यात येत आहे. महानगरपालिका क्षेत्रामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये डेंग्यूचे संशयित आणि निश्चित निदान केलेला एक तर मलेरियाचे ४० रुग्ण आढळले होते.
मलेरियाचे ३४ रुग्ण
ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत ऑक्टोबर महिन्यामध्ये डेंग्यूचा एकही संशयित रुग्ण सापडलेला नसून निश्चित निदान केलेले दोन आणि मलेरियाचे ३४ रुग्ण आढळले होते. या अनुषंगाने ही मोहीम सुरू केल्याचे महापालिकेने म्हटले आहे.