काँग्रेसचे लोकसभा निरिक्षक विश्वजीत कदम घेणार भिवंडीत राजकीय आढावा बैठक
By नितीन पंडित | Updated: August 13, 2023 16:12 IST2023-08-13T16:12:00+5:302023-08-13T16:12:12+5:30
भिवंडी लोकसभा काँग्रेस पार्टीचा बालेकिल्ला पुन्हा काँग्रेसकडे येण्यासाठी काँग्रेसमधून हालचाली सुरु झाल्या आहेत.

काँग्रेसचे लोकसभा निरिक्षक विश्वजीत कदम घेणार भिवंडीत राजकीय आढावा बैठक
भिवंडी : आगामी लोकसभा निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे. या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. काँग्रेसमध्ये देखील आगामी निवडणुकीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.तालुक्यातील रांजणोली नाका येथील वाटीका हाँटेल येथे १६ आँगस्ट दुपारी २ वाजता भिवंडी लोकसभा मतदार संघाचा राजकीय आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले असुन काँग्रेसचे भिवंडी लोकसभा निरिक्षक विश्वजीत कदम या बैठकीस हजर राहून भिवंडी लोकसभेचा आढावा घेणार आहेत.
काँग्रेसचे वरिष्ठ पदाधिकारी राजेश शर्मा देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती काँग्रेसचे ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांनी रविवारी दिली आहे.या बैठकीत भिवंडी लोकसभेतील भिवंडी पुर्व,भिवंडी पश्चिम,भिवंडी ग्रामीण,मुरबाड विधानसभा,शहापुर विधानसभा तसेच कल्याण पश्चिम विधानसभा या सर्व मतदारसंघाबाबत प्रत्येक विधानसभा अंतर्गत चर्चा सत्र आयोजित केले जाणार असुन संपुर्ण लोकसभा क्षेत्राची चाचपणी करण्यात येणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये पक्षाचे लोकप्रतिनिधींची देखील माहिती घेतली जाणार आहे.काँग्रेस पक्षाच्या सोनिया गांधी,राहुल गांधी, राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले, बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली भिवंडी लोकसभा काँग्रेस पार्टीचा बालेकिल्ला पुन्हा काँग्रेसकडे येण्यासाठी काँग्रेसमधून हालचाली सुरु झाल्या आहेत. भिवंडी लोकसभा क्षेत्रात अनेक जाती धर्माचे लोक राहतात त्यामुळे काँग्रेस पक्ष सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन जाणारा पक्ष असल्याने येणा-या काळात भिवंडी लोकसभा काँग्रेस पक्ष खेचून आणेल तसेच मागील काळात २०१४ व २०१९ मध्ये मोदी सरकारकडून भयंकर महागाई मनमानी कारभारामुळे जनता त्रस्त झाली आहे त्यामुळे भाजपला जनता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांची जागा दाखवेल अशी प्रतिक्रिया ठाणे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांनी रविवारी माध्यमांशी बोलतांना दिली आहे.