६५ मिमी पावसानंतरच वारसांना भरपाई, सरकारचा तुघलकी आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 02:29 AM2019-08-13T02:29:23+5:302019-08-13T02:29:41+5:30

ठाणे जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात तब्बल २६ जणांचा मृत्यू झाला असला, तरी केवळ १३ मृतांच्या नातलगांनाच शासनाची मदत मिळणार आहे.

The compensation to the heirs after 65 mm of rain, government's order | ६५ मिमी पावसानंतरच वारसांना भरपाई, सरकारचा तुघलकी आदेश

६५ मिमी पावसानंतरच वारसांना भरपाई, सरकारचा तुघलकी आदेश

Next

- सुरेश लोखंडे
ठाणे : जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात तब्बल २६ जणांचा मृत्यू झाला असला, तरी केवळ १३ मृतांच्या नातलगांनाच शासनाची मदत मिळणार आहे. कारण, ज्या दिवशी मृत्यू झाले, त्या दिवशी ६५ मिमी पाऊस झाला नसेल, तर मृतांचे नातलग मदतीला पात्र ठरत नाहीत, असा अत्यंत संतापजनक निकष मदत देताना नोकरशाहीने लागू केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे पावसाचे पाणी साचले असताना विजेचा शॉक लागून मरण पावलेली, झाड पडून मरण पावलेली किंवा पुराच्या पाण्यातून वाट काढताना बुडालेली व्यक्ती मदतीस पात्र ठरत नाही.

गेल्या आठवड्यात ठाणे जिल्ह्यात पुराच्या नैसर्गिक आपत्तीमुळे जीवित व वित्तहानी झाली आहे. पूरग्रस्तांना भरपाईसाठी राज्य शासनाकडून २० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. त्या रकमेतून शासकीय मदतीचे वाटप सुरू आहे. जे पुराच्या पाण्यात वाहून गेले, दरड कोसळून मयत झाले अथवा वीज पडून मृत्यू झाले, त्या दिवशी कमीतकमी ६५ मिमी पाऊस पडलेला असणे अनिवार्य आहे. तरच, मयत व्यक्तींचा परिवार शासनाच्या मदतीस पात्र ठरतो. जिल्ह्यात या निकषानुसार मृत पावलेल्या १३ व्यक्तींचे परिवार भरपाईस पात्र ठरले आहेत. त्याचबरोबर अन्य विविध कारणांमुळे दगावलेल्यांनाही मदतीस अपात्र ठरवले आहे. सरकारची ही अट संतापजनक आहे. अशा अटींमुळे मृतांच्या नातलगांना मदतीपासून वंचित ठेवण्याबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे.

पावसाच्या काळात मरण पावलेल्या १२ व्यक्तींच्या परिवारांना ४८ लाखांची शासकीय मदत देण्यात आली आहे. एका मयत व्यक्तीचा शवविच्छेदन अहवाल येणे बाकी आहे. ठाणे शहर व तालुक्यात सर्वाधिक १० जणांचे मृत्यू झाले आहेत. त्यातील केवळ तीन जणांचे कुटुंबीय मदतीस पात्र ठरले आहेत. उर्वरित सात मयत व्यक्तींचे नातेवाईक मदतीस अपात्र ठरवल्यामुळे ते वंचित आहेत. यामध्ये तलावात बुडून मरण पावणाऱ्या दोन जणांचा, विजेचा शॉक लागून मृत्यू झालेल्या दोन जणांचा तसेच स्पाइस अ‍ॅण्ड राइस हॉटेलमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने शॉक लागून मरण पावलेल्या दोन जणांचा समावेश आहे. याखेरीज, पाण्याच्या टाकीत बुडून निधन झालेल्या एका व्यक्तीस आणि पोहण्यासाठी गेला असता बुडून दगावलेल्या एकाला शासनाच्या मदतीस अपात्र ठरवलेले आहे.

कल्याण तालुक्यातील चौघांचा मृत्यू झाला. त्यांच्यातील चौघेही शासनाच्या मदतीस पात्र ठरवलेले आहेत. यामध्ये एक पुराच्या पाण्यात वाहून गेलेला आहे, तर कल्याण येथील नॅशनल उर्दू हायस्कूलच्या कम्पाउंडची भिंत पडून तिघे मयत झाले आहेत. त्यांच्या नातेवाइकास मदत दिली आहे. उर्दू शाळेची भिंत पडली, त्या दिवशी कमीतकमी ६५ मिमी या मर्यादेपेक्षा जास्त पाऊस पडलेला होता. यामुळे त्यांचे नातेवाईक मदतीस पात्र ठरले, अन्यथा ते मदतीला अपात्र ठरले असते. पावसाळ्यात दरड कोसळणे किंवा भिंत कोसळणे या घटना घडतात, तेव्हा अगोदर झालेल्या पावसामुळे किंवा बेकायदा बांधकामांमुळे त्या कोसळतात. त्या दिवशी झालेला पाऊस हा केवळ निमित्त असतो. त्यामुळे त्या दिवशी किती पाऊस झाला, हा निकष लावून मदत देणे हा तुघलकी निर्णय असल्याचे मृतांच्या नातलगांचे म्हणणे आहे. कल्याण तालुक्यातील त्या चौघांच्या परिवारास सुमारे १२ लाखांची मदत मिळाली आहे.

भिवंडी तालुक्यातील पाचपैकी तिघे पुराच्या पाण्यात वाहून गेले आणि एक वीज पडून दगावला आहे. त्यामुळे या चौघांचे परिवार मदतीस पात्र ठरले आहेत. यातील तिघांच्या परिवारांसही १२ लाख रुपये मिळाले, तर एकाचा शवविच्छेदन अहवाल येणे बाकी असल्याचे समजते. उर्वरित एक नऊ वर्षांचा मुलगा तळघरात पाणी साचले असता, त्यात बुडून मयत झाला आहे. त्याला अपात्र ठरवल्यामुळे परिवारास मदत मिळालेली नाही.

धबधब्यात बुडाल्यास भरपाईस अपात्र

अंबरनाथमधील तिघांपैकी एकास पात्र ठरवून त्याच्या परिवारास चार लाखांची मदत दिली. अपात्रांपैकी एका रिक्षाचालकाच्या अंगावर झाडाची फांदी, विजेच्या तारा व शेड कोसळली. तसेच कोंडेश्वर धबधब्यात बुडलेल्या तरुणाचे नातेवाईकही मदतीस अपात्र ठरले आहेत.

उल्हासनगरमध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. मात्र, ते मदतीस अपात्र ठरले. या दोघांपैकी एकाचा स्लॅब अंगावर पडून, तर दुसºयाचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. शहापूरच्या पुरात एकाचा वाहून गेल्यामुळे मृत्यू झाला. त्याच्या परिवारास मदत मिळावी, यासाठी कार्यवाही सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: The compensation to the heirs after 65 mm of rain, government's order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.