ठाणे : ऑनलाइनऐवजी प्रत्यक्ष महासभा घेण्यात यावी, अशी मागणी शुक्रवारी झालेल्या महासभेत पुन्हा सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली. भाजपसह विरोधी पक्षनेत्या प्रमिला केणी यांनी महासभा गडकरी किंवा घाणेकर नाट्यगृहात घेण्याची मागणी लावून धरली. प्रशासनाकडून शासनाच्या आदेशाची पायमल्ली केली जात असल्याचा आरोप यावेळी राष्ट्रवादीचे नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी केला. अखेर यावर महापौर नरेश म्हस्के यांनी पडदा टाकला. महासभा प्रत्यक्ष घेण्यासाठी पत्रव्यवहार सुरू असून, शासनाच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चाही झालेली आहे. लवकरच यावर तोडगा निघेल, असा दावाही त्यांनी केला.कोरोनामुळे महासभा वेबिनारद्वारे घेतल्या जात आहेत. ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या महासभेत गोंधळ झाला होता. त्यामुळे महासभा प्रत्यक्ष घेण्याची मागणी भाजपने केली होती. विरोधी पक्षनेत्या प्रमिला केणी यांनीही गडकरी किंवा घाणेकर नाट्यगृहात महासभा घेण्याची मागणी केली होती. दरम्यान, शुक्रवारी ऑनलाइन पद्धतीने महासभा सुरू होताच, प्रत्यक्ष महासभा घेण्याच्या मागणीसाठी नगरसेवकांनी महासभेत गोंधळ घातला. जगदाळे यांनीही शासनाचे आदेश असतानाही महासभा प्रत्यक्ष का घेतली जात नाही, असा सवाल प्रशासनाला केला. ऑनलाइन महासभेचा निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यांचा निषेधही जगदाळे यांनी केला. विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादीच्या गटनेत्यांनीही याबाबत आपली भूमिका मांडून महासभा प्रत्यक्ष घेण्यासाठी पुढाकार घेण्याची विनंती केली. शासनाच्या गाइडलाइननुसारच महासभा ऑनलाइन स्वरूपात सुरू असल्याचे सचिव अशोक बुरपुल्ले यांनी सभागृहाला सांगितले, परंतु त्यांच्या उत्तराने समाधान न झाल्याने अखेर महापौर नरेश म्हस्के यांनी या संदर्भात शासनाकडे आपण पत्रव्यवहार केल्याचे सांगितले. संबंधित अधिकाऱ्यांबरोबर गुरुवारी फोनवर चर्चाही केली आहे, परंतु अद्यापही त्यांच्याकडे प्रत्यक्ष महासभा घेण्याबाबत दुजोरा मिळालेला नसल्याने ऑनलाइन महासभा घेतली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.अर्बन रेस्ट रूमसाठी भाजपचे नगरसेवक आक्रमक मनपाने विविध भागांत १० कोटी खर्चून १६ आणि स्मार्टसिटीतून उभारलेल्या १२ अर्बन रेस्ट रूमपैकी केवळ सात रूम सुरू असल्याच्या निषेधार्थ गुरुवारी भाजपच्या महिला मोर्चाने आंदोलन केल्यानंतर महासभेतही भाजपच्या नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. रेस्ट रूमवर किंवा शौचालयांवर होर्डिंग्ज लागले आहेत. मात्र, शौचालये आणि रेस्ट रूम सुरू झाले नसल्याचा आरोप यावेळी नगरसेवकांनी केला. बहुसंख्य रेस्ट रूम सुरू असल्याचा दावा प्रशासनाने केला असला, तरी बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी भाजपच्या नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी केली. पेंडसे यांनी अर्बन रेस्ट रूम केव्हा सुरू होणार, असा सवाल केला. अनेक ठिकाणी उभारलेली शौचालये अद्यापही खुली केलेली नाहीत. मात्र, त्यांच्यावर जाहिरात फलक बसवले आहेत. त्यामुळे ही शौचलये केव्हा सुरू होणार, असा सवाल नम्रता कोळी यांनी केला. अखेर महापौर नरेश म्हस्के यांनी ज्या-ज्या ठिकाणी शौचालये सुरू होण्यापूर्वीच होर्डिंग्ज उभारले गेले आहेत, ते तत्काळ काढण्याचे आदेश दिले. शहरातील बहुसंख्य रेस्ट रूम सुरू असल्याचा दावा उपायुक्त मनीष जोशी यांनी केला. उर्वरित रेस्ट रूमच्या दुरुस्तीची कामे शिल्लक असून तीही लवकर केली जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले, परंतु या उत्तरावरून भाजपचे नगरसेवक आक्रमक झाले. अधिकारी वारंवार खोट्या माहिती देत असल्याचा आरोप पेंडसे यांनी केला.
ठामपाची प्रत्यक्ष महासभा घेण्यावरून पुन्हा गदारोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 01:21 IST