ठाणे पोलीस आयुक्तालयातील कमांडोंची फोर्स वन प्रशिक्षणात बाजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2021 23:31 IST2021-04-05T23:16:17+5:302021-04-05T23:31:51+5:30
मंबईच्या फोर्स वन ने आयोजित केलेल्या खडतर प्रशिक्षणामध्ये ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या जलद प्रतिसाद पथकाने बेस्ट हिटचा किताब पटकावून बाजी मारली आहे. या पथकाने ८४.२८ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला आहे.

जलद प्रतिसाद पथकाला मिळाला बेस्ट हिटचा किताब
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: मंबईच्या फोर्स वन ने आयोजित केलेल्या खडतर प्रशिक्षणामध्ये ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या जलद प्रतिसाद पथकाने बेस्ट हिटचा किताब पटकावून बाजी मारली आहे. या पथकाने ८४.२८ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला आहे. तर स्टार आॅफ द कोर्सचा पुरस्कार ज्योतीराव पोळ या कमांडोने पटकविला.
ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील जलद प्रतिसाद पथकातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांची शारीरिक क्षमता वाढविण्यासाठी तसेच कमांडोंचे मनोधैर्य उंचावण्यासाठी गेल्या तीन महिन्यांपासून प्रत्येकी २१ दिवसांच्या खडतर अशा चिता कोर्सचे आयोजन केले जात आहे. या कोर्सच्या दरम्यान कमांडोंना शारिरीक व्यायामाबरोबरच मनोधैर्य वाढविण्याचे प्रशिक्षण विविध तज्ज्ञांमार्फत देण्यात येते. प्रशिक्षणादरम्यान सर्व प्रशिक्षणार्थीना सकस आहार, प्रथमोपचार आणि स्फोटके अशा प्रकारचे कॅप्सूल कोर्सचेही आयोजन केले आहे. याच कोर्सच्या प्रभावी आयोजनामुळे मुंबईच्या फोर्स वन यांनी १७ फेब्रुवारी २०२१ ते १९ फेब्रुवारी या दरम्यान घेतलेल्या मूल्यमापन परीक्षांमध्ये ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांची ७५ टक्के कामगिरी उत्कृष्ठ असल्याचे आढळले.
त्यानंतर २२ मार्च २०२१ ते ३ एप्रिल दरम्यान फोर्स वन मुंबई येथे संपूर्ण महाराष्टÑातील जलद प्रतिसाद पथकांसाठी उजळणी कोर्स सत्र चारचे आयोजन केले होते. जलद प्रतिसाद पथक, ठाणे शहर अंतर्गत चिता कोर्स आणि कॅप्सूल कोर्समधील परीक्षांमध्ये पाच पैकी चार अशी ८० टक्के पारितोषिके पटकावून घवघवीत यश संपादन केले.
* अशी आहे कामगिरी-
बेस्ट पीपीटी - पोलीस अंमलदार प्रदीप भोये
बेस्ट बीपीईटी- पोलीस अंमलदार प्रदीप भोये
स्टार आॅफ द कोर्स - पोलीस अंमलदार ज्योतीराव पोळ आणि बेट हिटचे पारितोषिक जलद प्रतिसाद पथक, ठाणे शहर यांनी प्राप्त केले.
* विशेष म्हणजे एकूण सात जलद प्रतिसाद पथकांमध्ये ठाणे शहर यांनी ८४.२८ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला आहे. द्वीतीय सोलापूर जलद प्रतिसाद पथकाने - ७४.७१ टक्के तर नवी मुंबईने ७५.१४ टक्के गुण मिळवून तिसरा क्रमांक प्राप्त केला आहे.
* पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, अपर पोलीस आयुक्त (प्रशासन) प्रविण पवार आणि पोलीस उपायुक्त गणेश गावडे आणि मनोधैर्य उंचविण्यासाठी या जवानांना मार्गदर्शन करणारे पोलीस निरीक्षक श्रीकांत सोंडे यांनी या पथकाचे विशेष अभिनंदन केले.