कुलाबा वेधशाळेचे वादळी वाऱ्यानंतर धोक्याचे इशारे, मच्छीमारांचे नुकसान
By धीरज परब | Updated: May 8, 2025 00:25 IST2025-05-08T00:25:01+5:302025-05-08T00:25:25+5:30
Mira Road Rain Update: ६ मे मंगळवारी रात्री ९ च्या सुमारास वादळी वारे झोडपून काढू लागल्यावर केंद्र सरकारच्या कुलाबा वेधशाळेने रात्री १० च्या सुमारास वादळा नंतर मच्छीमारांना धोक्याचा इशारा जारी केला आहे. आधीच इशारा न मिळाल्याने भाईंदरच्या उत्तन - चौक भागातील मच्छीमारांची तारांबळ उडून मोठे नुकसान झाल्याची नाराजी मच्छीमारांनी व्यक्त केली आहे.

कुलाबा वेधशाळेचे वादळी वाऱ्यानंतर धोक्याचे इशारे, मच्छीमारांचे नुकसान
मीरारोड - ६ मे मंगळवारी रात्री ९ च्या सुमारास वादळी वारे झोडपून काढू लागल्यावर केंद्र सरकारच्या कुलाबा वेधशाळेने रात्री १० च्या सुमारास वादळा नंतर मच्छीमारांना धोक्याचा इशारा जारी केला आहे. आधीच इशारा न मिळाल्याने भाईंदरच्या उत्तन - चौक भागातील मच्छीमारांची तारांबळ उडून मोठे नुकसान झाल्याची नाराजी मच्छीमारांनी व्यक्त केली आहे.
मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास अचानक सोसाट्याचा वादळी वारा सुटला. त्यामुळे समुद्र देखील खवळला. मासेमारी हंगामाचा शेवटचा टप्पा असल्याने भाईंदरच्या उत्तन, चौक, पाली आदी भागातील मासेमारी बोटी मोठ्या संख्येने खोल समुद्रात मासेमारीसाठी गेल्या आहेत. मात्र अचानक आलेल्या ह्या वादळ व पावसा मुळे मच्छीमारांना बोटी माघारी घ्याव्या लागल्या आहेत. तर मासेमारीला जाण्यासाठी अनेक मच्छीमार नाखवांनी त्यांच्या बोटीत डिझेल, बर्फ, धान्य, खलाशी आदींची तयारी केली होती. मात्र वादळ - पाऊस ह्यामुळे मासेमारी करीत समुद्रात जाणे टाळावे लागले. त्यामुळे मच्छिमारांचे नुकसान झालेच पण वादळा मुळे त्यांची धावपळ उडाली. बोटी किनाऱ्यावर सुरक्षित ठिकाणी लावण्या करता त्यांची तारांबळ उडाली.
वादळी वारा सुरु झाल्या नंतर केंद्र सरकारच्या कुलाबा वेधशाळेने ६ मे च्या रात्री १० वाजता महाराष्ट्र आणि गोवा सागरी किनारपट्टीवरील मच्छीमारांसाठी धोक्याचा इशारा जारी केला आहे. ६ ते ११ मे साठी जारी केलेल्या इशाऱ्यात पालघर आणि ठाणे जिल्ह्याच्या समुद्री भागात ७ मे रोजी वादळासह तुरळक व मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
८ मे गुरुवार रोजीसाठी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजांच्या कडकडाटसह पाऊस येण्याची शक्यता वर्तवली आहे. तर ९ ते ११ मे दरम्यान किनारपट्टी भागात हलका पाऊस वा कोरडे वातावरणची शक्यता वर्तवली आहे. वादळा नंतर मच्छीमारांना धोक्याचा इशारा देणाऱ्या हवामान वेधशाळेच्या कारभारा बद्दल मच्छीमार नेते बर्नड डिमेलो यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
अचानक आलेले वादळ आणि मुसळधार पाऊस मुळे मच्छीमारांचे मोठे नुकसान झाले असून त्यांना स्वतःचा आणि खलाश्यांच्या तसेच मासेमारी बोटीच्या सुरक्षितते साठी किनाऱ्याकडे धाव घ्यावी लागली. अनेक मच्छिमार मासेमारीसाठी समुद्रात जाण्या करता सर्व तयारी करून होते. मात्र त्यांचा बर्फ आदी वाया जाऊन नुकसान झाले आहे. वेधशाळेने वेळीच इशारा दिला असता तर मच्छीमारांना आधीच खबरदारी घेता आली असती असे डिमेलो म्हणाले.