भिवंडी महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांसह प्रभारी शहर विकास प्रमुख निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2021 19:02 IST2021-06-08T19:02:33+5:302021-06-08T19:02:42+5:30
अधिकाऱ्यांच्या या निलंबन कारवाईमुळे भिवंडी मनपातील बेजबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

भिवंडी महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांसह प्रभारी शहर विकास प्रमुख निलंबित
भिवंडी - भिवंडी महापालिकेतील आरोग्य अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई केल्या नंतर व्यवसायिक गाळ्यांवर तोडू कारवाई करतांना शासकीय नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत भिवंडी महापालिकेचे प्रभाग समिती पाचचे तत्कालीन सहाय्यक आयुक्त यांच्यासह प्रभारी शहर विकास प्रमुख या दोघांनाही मनपा आयुक्त डॉ पंकज आशिया यांनी निलंबित केले असल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून मंगळवारी देण्यात आली आहे. अधिकाऱ्यांच्या या निलंबन कारवाईमुळे भिवंडी मनपातील बेजबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
मनपाचे तत्कालीन प्रभाग समिती क्रमांक पाचचे सहायक आयुक्त सोमनाथ सोष्टे तसेच तत्कालीन प्रभारी शहर विकास प्रमुख या पदावर कार्यरत असलेले राजेंद्र वरळीकर यांनी प्रभाग समिती क्रमांक पाच अंतर्गत शिवाजी चौक खाडीपार रोड येथील खासगी व्यावसायिक गाळ्यांवर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून कारवाई करणे आवश्यक होते, परंतु तसे न करता शासकीय नियमांचे उल्लंघन करून या गाळ्यावर कारवाई करण्यात आली आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांनी नेमून दिलेल्या कामात हलगर्जीपणा केल्याचे निदर्शनास आल्यामुळे पालिका आयुक्त डॉक्टर पंकज आशिया यांनी सोमनाथ सोष्टे व राजेंद्र वरळीकर या दोन्ही कर्मचाऱ्यांना विभागीय चौकशी करणेकामी महानगरपालिका सेवेतून निलंबित केले आहे.