चिमुरड्याला मारहाण प्रकरण: उल्हासनगरातील प्लेग्रुप शाळेची मनसेकडून तोडफोड
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 17:59 IST2025-09-22T17:58:23+5:302025-09-22T17:59:07+5:30
अवैधपणे चाललेल्या प्लेग्रुपवर कारवाईची मागणी

चिमुरड्याला मारहाण प्रकरण: उल्हासनगरातील प्लेग्रुप शाळेची मनसेकडून तोडफोड
सदानंद नाईक, उल्हासनगर : कवितेवर टाळ्या वाजवीत नसल्याच्या रागातून, ३ वर्षाच्या चिमुरड्याला शिक्षिकेकडून मारहाण झाल्याचा प्रकार उघड होऊन विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. सोमवारी मनसे शिष्टमंडळाने प्लेग्रुप संचालकाला याबाबत जाब विचारून प्लेग्रुप ची तोडफोड करण्यात आली. अश्या अवैधपणे चालणाऱ्या प्लेग्रुपवर कारवाई करण्याची मागणी मनसेचे जिल्हाप्रमुख बंडू देशमूख यांनी केली.
उल्हासनगर कॅम्प नं-४, गुरुनानक शाळेजवळू एक्सलेंट प्लेग्रुप मध्ये ३ वर्षाच्या चिमुरड्याने कवितेवर टाळ्या वाजविल्या नाही म्हणून शिक्षिकेकडून मारहाण झाल्याचा प्रकार उघड झाला. पालकांच्या तक्रारीवरून विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात शिक्षिकेवर गुन्हा दाखल झाला. सोमवारी महापालिका प्रशासन अधिकारी दिपक धनगर यांनीही प्लेग्रुपला भेट दिल्यानंतर, मनसेच्या शिष्टमंडळाने प्लेग्रुप संचालकाला झालेल्या घटणेबाबत जाब विचारून संचालकावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. यावेळी संतप्त झालेल्या मनसे सैनिकांनी प्लेग्रुपची तोडफोड केली. तसेच विठ्ठलवाडी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून संचालकावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली.
उल्हासनगर व अंबरनाथ मध्ये प्ले ग्रुपच्या नावाखाली अनेक अनाधिकृत शाळा चालवल्या जात असल्याचा आरोप मनसे जिल्हाप्रमुख बंडू देशमूख यांनी केला. अशा प्लेग्रुप मधील शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांची पोलीस पडताळणी बंधनकारक करण्यात यावी. तसेच या शाळांमध्ये शिकवणारे शिक्षक व कर्मचारी हे मानसिक दृष्ट्या सक्षम असल्याचा प्रमाणपत्र सक्तीचं करण्यात याव. अश्या कडक उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे देशमूख म्हणाले. प्लेग्रुपची तोडफोड करण्यात आल्यावर, अश्या अवैधपणे चालविलेल्या प्लेग्रुपची अशीच तोडफोड करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला. मनसेचे शहरप्रमुख संजय घुगे यांच्यासह असंख्य पदाधिकारी यावेळी उपस्थितीत होते.