Chemical wastewater treatment plant dust | रासायनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र धूळखात

रासायनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र धूळखात

अंबरनाथ : येथील आनंदनगर औद्योगिक वसाहतीमधील रासायनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र अनेक वर्षांपासून धूळखात आहे. हा प्रकल्प सुरू न केल्यास रासायनिक उद्योग अन्य राज्यांत स्थलांतरित होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात ‘आमा’ संघटनेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
एमआयडीसीमधील कारखानदार पर्यावरणस्नेही पद्धतीने उत्पादन प्रक्रिया करू इच्छित आहेत. मात्र, त्यासाठी आवश्यक असणारे सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र (सीईटीपी) सुरू करण्याबाबत एमआयडीसी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ उदासीन असल्याचा आरोप अंबरनाथ मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन (आमा) चे अध्यक्ष उमेश तायडे यांनी बुधवारी केला. गेली सात वर्षे संघटनेतर्फे पाठपुरावा करूनही सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र सुरू झालेले नाही.

या औद्योगिक वसाहतीतील १२७ कंपन्या या केंद्राच्या सभासद आहेत. केंद्र सुरू झाल्यास रासायनिक सांडपाण्यावर प्रक्रिया करणे सोपे होईल. वैयक्तिकरीत्या अशा प्रकारचे प्रक्रिया केंद्र उभारणे सर्वच उद्योजकांना परवडणारे नाही. प्रत्येक कंपनीने स्वतंत्र अशी यंत्रणा बसवली, तर एक घनमीटर रासायनिक सांडपाण्यावरील प्रक्रियेसाठी ९० ते ११० रुपये खर्च येतो. तीच प्रक्रिया जर सामायिक केंद्रातून झाली, तर एक घनमीटर पाण्यासाठी फक्त २९ रुपये खर्च उद्योजकांना परवडणारा आहे. मात्र, विनंती करूनही केंद्र सुरू करण्याबाबत यंत्रणा उदासीन आहे.

नऊ हजार कोटींची होते निर्यात
च्उद्योजकांचे प्रतिनिधी म्हणून संघटना हे केंद्र सुरू करण्याबाबत आग्रही आहे. कारण, हे केंद्र सुरू होत नसल्याचा ठपका उद्योजकांवर ठेवला जात आहे. आनंदनगर औद्योगिक वसाहतीमधून दरवर्षी नऊ हजार कोटींचा माल निर्यात होतो. त्यातून सरकारला कोट्यवधींचा महसूल मिळतो.
च्मात्र, गेल्या काही वर्षांत या त्रासाला कंटाळून अनेक उद्योग स्थलांतरित झाले. काही स्थलांतरित होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे व्यवस्थापन कोणत्याही कंपनीला द्या, परंतु सीईटीपी केंद्र लवकर सुरू करण्याची मागणी तायडे यांनी केली आहे.
 

Web Title: Chemical wastewater treatment plant dust

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.