- राजू ओढेठाणे - आंतरराष्ट्रीय क्रिकेट बुकी सोनू जालान याच्याविरुद्ध दाखल असलेल्या तीन कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात पोलिसांनी विशेष मकोका न्यायालयामध्ये आरोपपत्र सादर केले. ८६६ पानांच्या या आरोपपत्रात कुख्यात गँगस्टर रवी पुजारीसह काही फरार आरोपींचाही समावेश करण्यात आला आहे.बोरिवली येथील एका व्यावसायिकाच्या तक्रारीवरून ठाणेनगर पोलीस ठाण्यात जून २०१८ मध्ये भादंविचे कलम ३६३, ३८४, ३८६, ३८७ तसेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ चे कलम ३(१)(ब), ३(२) आणि ३(४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. तक्रारदार व्यावसायिकाचे तलावपाळी भागात मसाल्याचे दुकान आहे. जानेवारी २०१८ मध्ये सोनू जालानने या व्यावसायिकाला पुजारीच्या नावे तीन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. चारपाच दिवसांनी सोनू जालान आणि केतन तन्ना तक्रारदाराच्या दुकानात गेले. त्यावेळी सोनूच्या मोबाइलवरून रवी पुजारीने तक्रारदारास धमकी दिली. १७ जानेवारी २०१८ रोजी सोनू जालान, मुनीर खान, ज्युनिअर कलकत्ता, किरण माला आणि केतन तन्ना यांनी तक्रारदारास गोरेगाव येथील निबंधक कार्यालयात बळजबरीने नेले. तिथे तक्रारदाराच्या कांदिवली येथील फ्लॅटचा तारण करार सोनूचा भागीदार चिराग मजलानी याच्या नावे करून घेतला. आरोपींनी तक्रारदारास पुन्हा धमकावून २५ लाख रुपयांची खंडणीही उकळली. त्यानंतर आरोपींनी तक्रारदाराच्या फ्लॅटची पॉवर आॅफ अॅटर्नी चिराग मजलानी याच्या नावे करून घेतली. खंडणीविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांनी या प्रकरणाचा तपास केला.१८ जून रोजी खंडणीविरोधी पथकाने कल्याण येथील आधारवाडी कारागृहाकडून सोनूचा ताबा घेतला. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. सोनू जालान हा सुनील मालाड तसेच सोनू मालाड या नावानेही ओळखला जातो. क्रिकेट सट्ट्याचा त्याचा मोठा धंदा आहे. पोलिसांनी या प्रकरणामध्ये सोनूविरुद्ध ठाण्याच्या विशेष मकोका न्यायालयामध्ये आरोपपत्र सादर केले. या आरोपपत्रात रवी पुजारी, मुनीर खान, ज्युनिअर कलकत्ता, किरण माला आणि केतन तन्ना ऊर्फ राजा याच्यासह अन्य फरार आरोपींचाही समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली.साक्षी, पुराव्यांची माहितीआरोपपत्रामध्ये खंडणीच्या गुन्ह्याशी संबंधित साक्षीदारांचा उल्लेख आहे. या प्रकरणाशी संबंधित महत्वपूर्ण पुराव्यांचा तपशीलही आरोपपत्रामध्ये देण्यात आला आहे.गँगस्टर रवी पुजारीसह काही फरार आरोपींची माहिती आरोपपत्रामध्ये नमुद आहे.
खंडणी प्रकरणात आरोपपत्र दाखल, गँगस्टर रवी पुजारीचाही समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 02:04 IST