२६ कोटींच्या GST घोटाळा चौकशीत समोर आली १४० कोटींची चोरी; मुंबई-ठाण्याशी कनेक्शन काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 14:28 IST2025-02-13T14:26:50+5:302025-02-13T14:28:55+5:30
बनावट जीएसटी देयकांच्या आधारे १४० कोटी रुपयांची करचोरी करणाऱ्याला मुंबईच्या क्षेत्रीय केंद्रीय जीएसटी विभागाने अटक केली आहे.

२६ कोटींच्या GST घोटाळा चौकशीत समोर आली १४० कोटींची चोरी; मुंबई-ठाण्याशी कनेक्शन काय?
GST Fraud: ठाणे जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांचा जीएसटी घोटाळा उघडकीस आला आहे. या प्रकरणात अधिकाऱ्यांनी २६.९२ कोटी रुपयांच्या बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट घोटाळ्याशी संबंधित जीएसटी चोरीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या रॅकेटच्या मास्टरमाइंड अटक करण्यात आली आहे. मात्र या कारवाईमधून मोठी माहिती समोर आली आहे. २६.९२ कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा तपास करताना १४० कोटी रुपयांच्या बनावट जीएसटी इनव्हॉइस रॅकेटचाही पर्दाफाश झाला.
बनावट जीएसटी देयकांच्या आधारे १४० कोटी रुपयांची करचोरी झाल्याचे समोर आलं आहे. या प्रकरणात मीरा रोड येथून एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. कपाडिया मोहम्मद सुल्तान असं अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. सीजीएसटी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कपाडिया मोहम्मद सुल्तानने जीएसटी न भरता बनावट इनव्हॉइस तयार करण्यासाठी बनावट कंपन्यांचे जाळे तयार केले होते. कपाडियाने १८ बनावट कंपन्यांच्या नावाने देयके इनव्हॉइस करुन जीएसटीचा परतावा घेतला. या बनावट परताव्यांमधून त्याने १४० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचे समोर आलं आहे.
कपाडियाने रॉयल एंटरप्राइज, सरस्वती एंटरप्राइजेस, लुकास इन्फ्राट्रेड एलएलपी आणि मारुती ट्रेडिंग यासारख्या कंपन्या केवळ सरकारची फसवणूक करण्यासाठी स्थापन केल्या होत्या. कपाडियाने या घोटाळ्यासाठी विविध लोकांचे आधार, पॅनकार्ड आणि इतर केवायसी कागदपत्रे वापरली होती. यासाठी त्याने या लोकांना पैसेही दिले होते. त्यानंतर त्याने या ओळखपत्रांचा गैरवापर करून बनावट फर्म्सच्या नावाने बँक खाती उघडली आणि त्यामध्ये जीएसटी परतावा घेतला. कपाडियाला १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
पुण्यात १,१९६ कोटींचा जीसएटी घोटाळा
जीएसटी गुप्तचर महासंचालनालयाच्या पुणे विभागीय शाखेने १,१९६ कोटी रुपयांचा जीएसटी घोटाळा उघडकीस आणला. अधिकाऱ्यांनी पुणे, दिल्ली, नोएडा आणि मुझफ्फरनगरमधील विविध ठिकाणी छापे टाकून केलेल्या तपासात बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट (आयटीसी) व्यवहारांमध्ये सहभागी बोगस कंपन्यांचे एक रॅकेट समोर आणलं.