काँग्रेस पदाधिका-यांस मारहाण केल्याप्रकरणी महापौरांविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2017 19:56 IST2017-11-29T19:56:43+5:302017-11-29T19:56:54+5:30
खराब रस्त्याबाबत अभियंत्याकडे तक्रार करण्यास गेलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यास महापौर जावेद दळवी यांनी मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

काँग्रेस पदाधिका-यांस मारहाण केल्याप्रकरणी महापौरांविरोधात गुन्हा दाखल
भिवंडी : खराब रस्त्याबाबत अभियंत्याकडे तक्रार करण्यास गेलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यास महापौर जावेद दळवी यांनी मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
शांतीनगर रोडवरील नादुरूस्त रस्त्यामुळे परिसरातील विद्यार्थ्यांचे हाल होत आहे. निदान हा रस्ता तात्पुरता दुरूस्त करावा,अशी मागणी करण्यासाठी काँग्रेस प्रदेश सदस्य अब्दुल सलाम अब्दुल गफार शेख व सुझाऊद्दीन अन्सारी हे दोघे काल मंगळवार रोजी दुपारी अभियंता भट यांना भेटण्यास गेले होते. तेव्हा पालिकेच्या आवारात प्रवेशद्वारासमोर अभियंता भट हे महापौर जावेद दळवी यांच्या गाडीत बसत होते.त्याचवेळी सलाम शेख यांनी भट यांच्याकडे तक्रार केली असता महापौर जावेद दळवी हे आपल्या गाडीतून खाली उतरले आणि ‘आज तुला सोडणार नाही’अशी धमकी देत मारहाण केली.या मारहाणीने सलाम खाली जमीनीवर पडले. त्यानंतर एका वस्तूने दळवी यांनी डोक्यावर प्रहार केल्याने सलाम शेख गंभीर जखमी झाले. त्यांना ताबडतोब सिराज हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता त्यांना जखमेवर पाच टाके घालण्यात आल्याची माहिती डॉ.नुरूद्दीन अन्सारी यांनी दिली. या प्रकरणी सलाम शेख यांनी आज बुधवार रोजी दुपारनंतर महापौर जावेद दळवी यांच्या विरोधात निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.