धावपट्टीच्या यंत्रणेत बिघाड झाल्याने पोलीस भरतीसाठी आलेले उमेदवार ताटकळले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 08:21 IST2026-02-21T08:20:54+5:302026-02-21T08:21:08+5:30
धावण्याची परीक्षा असल्याने पहाटेपासून असंख्य उमेदवार हे मैदानाच्या परिसरात जमलेले होते. परंतु धावण्याची परीक्षाच सुरु न झाल्याने प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांमध्ये अस्वस्थता पसरली.

धावपट्टीच्या यंत्रणेत बिघाड झाल्याने पोलीस भरतीसाठी आलेले उमेदवार ताटकळले
मीरारोड - मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाची पोलीस भरती सुरु असून शुक्रवारी १०० मीटर धावणेच्या धावपट्टीत तांत्रिक बिघाड झाल्याने धावणे परीक्षा स्थगित करावी लागली. त्यामुळे पहाटेपासून आलेल्या उमेदवारांना त्याचा त्रास सहन करावा लागला आणि दुपारपर्यंत ताटकळत थांबावे लागले.
सध्या पोलीस आयुक्तालयाची भरती सुरु असून त्यासाठी शारीरिक चाचणी परीक्षा भाईंदरच्या सुभाषचंद्र बोस मैदानात घेतल्या जात आहेत. पोलिसांनी मैदान व परिसरात व्यवस्था केलेली आहे. १०० मीटर धावण्याच्या धावपट्टीवर पोलिसांनी यांत्रिक उपकरणे लावलेली आहेत. मात्र शुक्रवारी ऐन परीक्षेवेळी त्यात बिघाड झाल्याने धावण्याची परीक्षा रखडली.
धावण्याची परीक्षा असल्याने पहाटेपासून असंख्य उमेदवार हे मैदानाच्या परिसरात जमलेले होते. परंतु धावण्याची परीक्षाच सुरु न झाल्याने प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांमध्ये अस्वस्थता पसरली. धावण्याची तयारी करून आलेल्या आणि बरेच तास ताटकळत रहावे लागल्याने उमेदवारांमध्ये चलबिचल सुरु झाली. मैदानाच्या बाहेरच नाल्यावरील पदपथावरच ते बसून होते. परीक्षा सुरु होईल याच्या प्रतीक्षेत त्यांना कुठे जाता देखील आले नाही.
पहाटेपासून दुपारी २ वाजेपर्यंत अनेक उमेदवार हे अन्न - पाण्या वाचून होते. मनसेच्या काही कार्यकर्त्यांना हा प्रकार समजल्यावर त्यांनी मैदानाच्या बाहेर जमलेल्या उमेदवारांना पाणी दिले. काहींची तात्पुरती थांबण्याची सोय केली. पोलीस प्रशासनाच्या अपुऱ्या नियोजनामुळे धावणे परीक्षेसाठी आलेल्या उमेदवारांचे हाल झाले या बद्दल मनसेसह अनेकांनी संताप व्यक्त केला. शुक्रवारच्या महासभेत काँग्रेसचे नगरसेवक अनिल सावंत यांनी देखील पोलीस भरतीसाठी आलेल्या राज्यभरातील उमेदवारांच्या गैरसोयीचा मुद्दा मांडत महापालिकेने उमेदवारांची व्यवस्था करावी अशी मागणी महापौर डिम्पल मेहता यांच्याकडे केली.