Bumps on the husband of the accused who committed suicide by killing his wife | पत्नीची हत्या करून आत्महत्येचा बनाव करणाऱ्या आरोपी पतीला ठोकल्या बेड्या
पत्नीची हत्या करून आत्महत्येचा बनाव करणाऱ्या आरोपी पतीला ठोकल्या बेड्या

बदलापूर  : पत्नीची हत्या करून आत्महत्येचा बनाव करणाऱ्या आरोपी पतीला बदलापूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पतीने पत्नीची गळा आवळून हत्या केली, त्यानंतर तिने आत्महत्या केली, असा बनाव रचण्यासाठी तिचा मृतदेह दोरीने पंख्याला लटकवला. मात्र वैद्यकीय अहवालात पतीचं बिंग फुटलं आणि काही तासांतच त्याला गजाआड करण्यात आलं.

अंबरनाथ एमआयडीसीत एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या तुषार सांबरे याचा 2016 साली माथेरानच्या जुमापट्टीला राहणाऱ्या कांचनशी विवाह झाला होता. त्यांना अडीच वर्षांचा मुलगाही आहे. मात्र लग्न झाल्यापासून तुषार हा सातत्याने कांचनच्या माहेरी पैसे मागत होता. एक दोनदा कांचनच्या वडिलांनी त्याला पैसे दिले. मात्र त्यामुळे तुषारच्या मागण्या वाढतच गेल्या.

सोमवारी 2 डिसेंबर रोजी कांचन ही पतीसोबत माहेरी आली होती. तिथून निघताना पुन्हा एकदा तुषारने कांचनच्या वडिलांकडे दीड लाख रुपयांची मागणी केली. मात्र त्यांनी पैसे द्यायला असमर्थता दर्शवल्यानं तुषार रागारागात पत्नीला घेऊन बदलापूरला आला. त्यानंतर पती पत्नीमध्ये भांडण झालं आणि तुषारने दोरीने गळा आवळून कांचनची हत्या केली. यानंतर आपलं कृत्य लपवण्यासाठी त्याने कांचनचा मृतदेह पंख्याला लटकवला आणि तिने आत्महत्या केल्याचा बनाव रचला.

कांचनच्या कुटुंबीयांनी हा प्रकार समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र कांचनचा मृतदेह पाहून तिची हत्या झाल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. त्यानुसार पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. त्यात कांचनने आत्महत्या केली नसून तिची हत्याच झाल्याचं निष्पन्न झालं आणि पोलिसांनी तुषारला हत्या आणि पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा नोंदवत त्याला बेड्या ठोकल्या.

Web Title: Bumps on the husband of the accused who committed suicide by killing his wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.