‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 03:29 IST2025-05-15T03:29:19+5:302025-05-15T03:29:19+5:30

पोलिसाने थेट क्यूआर कोड स्कॅन करून पैसे मागितल्याने ‘मी सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’ अशी म्हणण्याची वेळ आली आहे. 

bribe taken with qr code two policemen arrested know what is the exact case | ‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?

‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : पूर्वी लाच ही थेट मागितली जायची किंवा कुणा मध्यस्थीद्वारे स्वीकारली जायची. पण आता आधुनिक काळात लाच मागण्याची पद्धतही बदलली असल्याचे ठाण्यातील मोबाइल डेटा  चोरी प्रकरणातून उघड झाले आहे. पोलिसाने थेट क्यूआर कोड स्कॅन करून पैसे मागितल्याने ‘मी सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’ अशी म्हणण्याची वेळ आली आहे. 

मोबाइल फोन क्रमांकाचा डेटा चोरून विकला जात असल्याची माहिती एटीएसला समजली आणि या प्रकरणाला वाचा फुटली. तब्बल दोन वर्षांहून अधिक काळ हा प्रकार सुरू होता. या प्रकरणात दोन पोलिसांसह पोलिस खबऱ्या अशा तिघांना अटक केली. त्या तिघांनाही न्यायालयाने १५ मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. एका पोलिसाने, तर व्यवहाराचे पैसे घेण्यासाठी चक्क क्यूआर कोडचा वापर केला. एवढेच नाहीतर कुटुंबातील काही जणांच्या खात्यावर या व्यवहाराचे पैसे घेतल्याचे तपासात पुढे आले. 

तपासणीपूर्वीच डेटा चोरी

५ मे रोजी ठाणे शहर पोलिस आयुक्तालयातील सायबर पोलिस ठाण्यात मोबाइलमधील डेटा चोरी करून विकल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी आकाश सुर्वे आणि हर्षद परब या दोन पोलिसांसह मोहम्मद सोहेल मोहम्मद शब्बीर राजपूत या खबऱ्याला अटक केली. 

गुन्हे शाखेने त्या तिघांचे मोबाइल जप्त केले असून, खबऱ्याची गाडीही ताब्यात घेतली. तर, मोबाइल तपासणीपूर्वी खबऱ्या दोघांना माहिती काढण्यास सांगायचा. त्या बदल्यात तो ठरल्याप्रमाणे पैसे देत होता, तर मोबाइलच्या तपासणीत एका पोलिस शिपायाने क्यूआर कोडचा वापर करून पैसे घेतल्याचे समोर आले.

खबऱ्याकडे पोलिसाचा ड्रेस!

अटकेत असलेला मोहम्मद सोहेल मोहम्मद याच्याकडे पीएसआय पोलिस अधिकाऱ्याचा ड्रेस, पोलिस काठी, वायरलेस, पोलिस कॅप, गाडीवर पोलिसांचे स्टिकर आदी वस्तू आढळल्या. याशिवाय तो लॉजवर राहताना पोलिस असल्याची बतावणी करून राहत असल्याचेही तपासात समोर आले आहे.

लोकेशनच्या नोंदींचीही विक्री 

अटकेतील पोलिस परब याने एसडीआर आणि मोबाइल लोकेशन, तर सुर्वे याने सीडीआर याबाबतची माहिती चोरून विक्री केल्याचे तपासात पुढे आले आहे. यामध्ये परब याने १०० मोबाइल फोनचे लोकेशन दिले असून, ते लोकेशन नेमके कशासाठी दिले, त्यातून कोणता गुन्हा घडला आहे का? याचा तपासही सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली.

 

Web Title: bribe taken with qr code two policemen arrested know what is the exact case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.