२७ गावे निवडणुकीत दाखवणार भाजपाला ठेंगा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 00:45 IST2019-01-28T00:45:19+5:302019-01-28T00:45:40+5:30
केडीएमसीतून २७ गावे वगळून त्यांची स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याचे आश्वासन देणाऱ्या भाजपा सरकारला ही गावे निवडणुकीत ठेंगा दाखविणार आहेत.

२७ गावे निवडणुकीत दाखवणार भाजपाला ठेंगा
कल्याण : केडीएमसीतून २७ गावे वगळून त्यांची स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याचे आश्वासन देणाऱ्या भाजपा सरकारला ही गावे निवडणुकीत ठेंगा दाखविणार आहेत. भाजपाने खोटी आश्वासने दिली असून, त्याबाबत नागरिकांत जागृती करण्यासाठी १० फेब्रुवारीपासून बॅनर लावणार असल्याचे २७ गाव सर्वपक्षीय संघर्ष समितीने सांगितले.
काँग्रेसने गुरुवारी कल्याणमध्ये सभा घेतली. यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची समितीच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता मार्चमध्ये जाहीर होणार आहे. त्यापूर्वी भाजपाच्या विरोधात लढा उभारला जाणार असल्याची माहिती समितीच्या शिष्टमंडळाने चव्हाण यांना दिली आहे. यावेळी समितीचे अध्यक्ष गंगाराम शेलार, पदाधिकारी गुलाब वझे, चंद्रकांत पाटील, वंडार पाटील, अर्जुन चौधरी, विजय भाने, शिवराम गायकर, दत्ता वझे, वासुदेव गायकर, अरुण वायले आदी मान्यवर उपस्थित होते. भाजपाच्या फसवेगिरीचा पंचनामा १० फेब्रुवारीपासून ठिकठिकाणी बॅनरद्वारे केला जाणार आहे, असे समितीने सांगितले.
राष्ट्रवादीचे आमदार जगन्नाथ शिंदे यांनी गावे वगळण्याचा प्रश्न विधिमंडळाच्या अधिवेशनात उपस्थित केला होता. तेव्हा देखील मुख्यमंत्र्यांनी गावे वगळण्यासंदर्भात कोकण भवन आयुक्तांकडे अहवाल प्रलंबित आहे. हा अहवाल येताच गावे वगळण्याचा निर्णय घेऊ असे स्पष्ट केले होेते.