भाजपच्या उद्याच्या बैठकीत ठाणे, मुंबईत स्वबळाची चाचपणी? पालिका निवडणुकीवर चर्चेची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 12:35 IST2025-06-05T12:34:40+5:302025-06-05T12:35:18+5:30

पालिका निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू

BJP to test strength in Thane, Mumbai in tomorrow's meeting Discussion on municipal elections likely | भाजपच्या उद्याच्या बैठकीत ठाणे, मुंबईत स्वबळाची चाचपणी? पालिका निवडणुकीवर चर्चेची शक्यता

भाजपच्या उद्याच्या बैठकीत ठाणे, मुंबईत स्वबळाची चाचपणी? पालिका निवडणुकीवर चर्चेची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: ठाणे, मुंबईमध्ये स्वबळावर निवडणुका लढण्याच्या दृष्टीने भाजपने चाचपणी सुरू केली असून, त्याच अनुषंगाने ठाण्यात येत्या शुक्रवारी कोकण विभागाची बैठक भाजपने आयोजित केली आहे. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या ११ वर्षांच्या विकासकामांवर चर्चा केली जाणार आहे. आगामी पालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याच्या दृष्टीने चर्चा होणार असल्याची माहिती भाजपमधील सूत्रांनी दिली.

 

ठाण्यातील रेमंड येथील भाजपच्या कार्यालयात ही बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला चंद्रशेखर बावनकुळे, नितेश राणे, गणेश नाईक, रवींद्र चव्हाण आदींसह ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदींसह कोकण आणि ठाण्यातील १४ जिल्हाध्यक्ष, माजी आमदार, १८०हून अधिक मंडळ अध्यक्ष व इतर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. मुंबईत भाजपच्या वतीने सर्व्हे करण्यात आला आहे. ठाण्यातही भाजपकडून तशा प्रकारचा सर्व्हे केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ठाणे जिल्ह्यातील भाजपची ताकद लक्षात घेऊन भाजपने यापूर्वीच स्वबळाचा नारा दिला आहे.

पालिका निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू

ठाण्यात भाजपला एकदाही महापालिकेवर सत्ता प्रस्थापित करता आलेली नाही. गेली २९ वर्षे ठाण्यावर शिवसेनेचे वर्चस्व आहे. २०१७च्या निवडणुकीत भाजपचे ठाण्यात २३ नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठ्या प्रमाणात यश मिळाले. त्यामुळेच आता भाजपने आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत ठाण्यातील भाजपचे पदाधिकारी स्वबळाचा आग्रह धरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. जिल्हाध्यक्ष आणि मंडळ अध्यक्षांमार्फत संपूर्ण कोकणात भाजप जनतेपर्यंत पोहोचून मतदारांचा कौल जाणून घेणार असल्याची माहिती भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.

ही निवडणुकीची बैठक नाही, संघटनात्मक बैठक आहे. बैठकीत संकल्प ते सिद्धी तक या माध्यमातून मागील ११ वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्फत करण्यात आलेल्या विकासकामांची माहिती दिली जाणार आहे. ती माहिती जनतेपर्यंत घेऊन जाण्याचे काम पदाधिकारी करणार आहेत.
-संदीप लेले, शहर अध्यक्ष, भाजप, ठाणे

Web Title: BJP to test strength in Thane, Mumbai in tomorrow's meeting Discussion on municipal elections likely

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.