विचारसरणी सोडून काँग्रेससोबत जाणाऱ्यांवर भाजपने कारवाई करावी: खासदार डॉ. श्रीकांत शिंदे
By संदीप प्रधान | Updated: January 10, 2026 05:41 IST2026-01-10T05:41:06+5:302026-01-10T05:41:06+5:30
मित्रपक्षाला बाजूला ठेवून भाजपने काँग्रेससोबत हातमिळवणी केली. आमच्या उमेदवारांपुढे सक्षम उमेदवार न दिल्याने आम्ही बिनविरोध आलो.

विचारसरणी सोडून काँग्रेससोबत जाणाऱ्यांवर भाजपने कारवाई करावी: खासदार डॉ. श्रीकांत शिंदे
संदीप प्रधान, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : अंबरनाथमधील स्थानिक भाजप नेत्यांनी हिंदुत्ववादी विचारसरणी सोडून काँग्रेससोबत हातमिळवणी केली. भाजपने अशा नेत्यांवर कडक कारवाई करायला हवी. या कृतीमुळे चुकीचा संदेश लोकांमध्ये गेला. सत्ता हे सर्वस्व नसून हिंदुत्व हेच आमच्याकरिता सर्वस्व आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्ता, मंत्रिपदावर लाथ मारून केवळ हिंदुत्ववादी विचारसरणीकरिता भाजपची तीन वर्षांपूर्वी साथ दिली हे विसरता कामा नये, असे मत शिंदेसेनेचे खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केले.
अंबरनाथ नगरपालिकेत शिंदेसेनेचे जास्त सदस्य विजयी झाले असतानाही मित्रपक्षाला बाजूला ठेवून भाजपने काँग्रेससोबत हातमिळवणी केली. महापालिका निवडणुकीत भाजप-शिंदेसेना युती असली तरी निकालानंतर शिंदेसेनेला बाजूला ठेवून भाजप अन्य पक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन करणार नाही का? असा सवाल केला असता खा. शिंदे यांनी वरील उत्तर दिले.
अंबरनाथमध्ये शिंदेसेना हाच मोठा पक्ष आहे. शिंदेसेनेला दहा हजारांपेक्षा जास्त मते मिळाली. भाजपने केवळ नगराध्यक्ष बसवला. मात्र, त्या पक्षाचे केवळ १४ नगरसेवक विजयी झाले. शिंदेसेनेचे २८ नगरसेवक आहेत. भाजप-शिंदेसेना यांची नैसर्गिक युती आहे. मात्र, काही नेत्यांनी चुकीचे काम केले व त्यामुळे चुकीचा संदेश जनतेत गेला, असेही खा. शिंदे म्हणाले.
महापालिकेत युती केल्याने शिंदेसेना व भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण होऊन बंडखोरी झाली असे वाटत नाही का?
खा. शिंदे : मला हा दावा मान्य नाही. उलटपक्षी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भाजप-शिंदेसेना युती करते आणि महापालिकेच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांना एकमेकांशी लढवतात, अशी भावना दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांमध्ये प्रबळ होती. निवडणुकीनंतर जर युती करणारच आहात तर अगोदर लढून व परस्परांवर टीका करून चुकीचा संदेश जनतेत जाईल, हा विचार करून युती केली. युतीमुळे कार्यकर्त्यांची ताकद वाढते आणि त्यांना सुरक्षित वाटते.
बिनविरोध सदस्यांची मोठी संख्या पाहता भाजप, शिंदेसेना यांच्या राजकारणाबाबत जनतेच्या मनात संशय निर्माण झाला असे वाटत नाही का?
खा. शिंदे : बिनविरोध निवड होण्याचे मुख्य कारण युतीच्या उमेदवारांपुढे विरोधकांनी सक्षम उमेदवार दिले नाहीत. आपण निवडणूक लढवली तर निवडून येऊ हा विश्वास त्यांना वाटला नाही. त्यांचा त्यांच्या पक्षावर व नेत्यांवर विश्वास नसल्याने त्यांनी माघार घेतली. लोकशाहीत सगळ्यांना निवडणूक लढविण्याचा अधिकार आहे. परंतुु, नगरपालिका निवडणुकीत आपले नेते घराबाहेर पडले नाहीत हे त्यांच्या महापालिकेतील उमेदवारांनी पाहिले होते. अशा परिस्थितीत कार्यकर्ता कुठल्या ताकदीवर लढेल? त्यामुळे बिनविरोध उमेदवार निवड हा सर्वस्वी विरोधकांच्या अपयशाचा पुरावा आहे.
अंबरनाथ, बदलापूरमध्ये भाजपने आपला नगराध्यक्ष बसवला. डोंबिवलीत १४ नगरसेवक बिनविरोध निवडून आणले. कल्याण लोकसभा मतदारसंघावरील शिंदेसेनेची पकड ढिली होत असल्याने खा. श्रीकांत शिंदे यांच्या भावी राजकारणापुढे संकट उभे आहे का?
खा. शिंदे : अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुकीत शिंदेसेनेचे नगरसेवक बरेच जास्त संख्येने विजयी झाले. शिंदेसेनेला १० हजार जास्त मते मिळाली. विधानसभा निवडणुकीत बालाजी किणीकर यांना ५३ हजारांचे मताधिक्य आहे. कल्याणमध्ये शिंदेसेनेचा अगोदर एक आमदार होता. त्यांची संख्या दोन झाली. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीवरील शिंदेसेनेची पकड ढिली झाली असे म्हणणे योग्य नाही. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतील पराभवाचे आत्मपरीक्षण आम्ही नक्की करू. नगराध्यक्षपदाची निवडणूक नसती तर शिंदेसेनेचे नगराध्यक्ष बसले असते हे सत्य आहे.