भाजप, शिंदेसेनेतील प्रवेश माेहीम तूर्त थंडावली
By अनिकेत घमंडी | Updated: November 25, 2025 10:53 IST2025-11-25T10:52:21+5:302025-11-25T10:53:34+5:30
Local Body Election: शिंदेसेनेच्या माजी नगरसेवकांना भाजपमध्ये प्रवेश देण्यावरून गेल्या आठवड्यात मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीवर शिंदेसेनेच्या मंत्र्यांनी बहिष्कार घातल्याने व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट दिल्ली गाठून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे तक्रार केल्याने कल्याण-डोंबिवलीमधील दोन्ही पक्षांतील प्रवेशांना ‘ब्रेक’ लागला.

भाजप, शिंदेसेनेतील प्रवेश माेहीम तूर्त थंडावली
- अनिकेत घमंडी
डोंबिवली - शिंदेसेनेच्या माजी नगरसेवकांना भाजपमध्ये प्रवेश देण्यावरून गेल्या आठवड्यात मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीवर शिंदेसेनेच्या मंत्र्यांनी बहिष्कार घातल्याने व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट दिल्ली गाठून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे तक्रार केल्याने कल्याण-डोंबिवलीमधील दोन्ही पक्षांतील प्रवेशांना ‘ब्रेक’ लागला. लागलीच पक्षप्रवेश न करता कदाचित निवडणूक प्रक्रियेला वेग आल्यावर प्रवेश दिले जातील, असा एकूण होरा दिसत आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत शिंदेसेनेचे महेश पाटील, डॉ. सुनीता पाटील, सायली विचारे, संजय विचारे, अनमोल पाटील यांचा मागील आठवड्यात भाजपमध्ये प्रवेश झाला.
या प्रवेशाने दुखावलेल्या शिंदेसेनेच्या मंत्र्यांनी राज्यभर भाजपच्या सुरू असलेल्या आक्रमकतेविरुद्ध नाराजी व्यक्त करत मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार घातला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन नाराजी व्यक्त केली. फडणवीस यांनी शिंदेसेनेच्या मंत्र्यांना सुनावल्याचे समजते. मात्र, त्यानंतर आता लागलीच शिंदेसेनेतील कुणाला प्रवेश देऊ नका, असे आदेश फडणवीस यांनी दिल्याचे समजते. शिंदे यांनीही आपल्या पक्षातील प्रवेश थांबवले.
भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणाले, ४,५०० शिवसैनिक संपर्कात
रवींद्र चव्हाण यांनी माध्यमांना सांगितले की, ४ हजार ५०० शिवसैनिक त्यांच्या संपर्कात असून, त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. ते थांबणार नाहीत. मात्र, त्यांनी ते शिवसैनिक उद्धवसेनेचे की शिंदेसेनेचे याबाबत मिठाची गुळणी घेतली. आगामी काळात आणखी काय होते? याकडे शिंदेसेनेचेही लक्ष लागले आहे. शनिवारी व रविवारी दिवसभर शहरात विविध विकासकामांचा शुभारंभ आणि अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांना चव्हाण यांनी हजेरी लावली.
दोन्ही दिवस त्यांच्या हालचालींवर दोन्ही शिवसेना नेत्यांचे लक्ष होते. कुठे प्रवेश होत आहेत का? याची सतत ते चाचपणी करत होते. मात्र, दोन्ही दिवस चव्हाण यांनी याठिकाणी प्रवेश घेतले नाहीत. मात्र, त्यांनी मनसेचे माजी नगरसेवक प्रकाश भोईर, सरोज भोईर यांना कार्यक्रमाला बोलावून त्यांचा लवकरच निर्णय होईल. ते आपलेच आहेत, असे म्हटले. भोईर यांनीही चव्हाण हे सातत्याने आमदार म्हणून विकासकामांसाठी निधी देतात. त्यांच्याशी जवळीक आहे, असे म्हटले. तशा आशयाचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे.
दिव्यात शिंदेसेनेला राेखण्यासाठी भाजप-उद्धवसेना-मनसे ‘महायुती’?
ठाणे : येथे एकीकडे शिंदेसेना विरुद्ध भाजप, असा राजकीय संघर्ष तापला असताना, दिव्यात अनपेक्षित राजकीय समीकरण तयार होत आहे. येथे आठ जागांवर शिंदेसेनेला रोखण्यासाठी भाजप, उद्धवसेना आणि मनसे एकत्र येण्याचे संकेत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या तिन्ही पक्षांमध्ये गेल्या काही दिवसांत गुप्त चर्चा सुरू असून, ‘दिव्यातून शिंदेसेनेची हद्दपारी’ हा नारा जोर धरू लागला आहे.
श्रेयवादाच्या चढाओढीतून सुरू झालेली शिंदेसेना–भाजप यांच्यातील वादाची ठिणगी मारामारीपर्यंत गेली. त्यामुळे दोन्ही पक्षांतील तणाव सर्वपक्षीय चर्चेचा विषय ठरला आहे. पण, परिस्थिती अधिक गुंतागुंतीची आहे.गेल्या निवडणुकीत दिव्यात शिंदेसेनेचे आठ नगरसेवक निवडून आले. नंतर भाजपचे काही पदाधिकारी शिंदेसेनेत गेले आणि येथे राजकीय समीकरणे बदलू लागली. शिंदेसेनेला रोखण्याकरिता तीनही पक्षांनी एकत्र येण्याचे संकेत मिळू लागले आहेत. स्थानिक समस्यांमुळे नाराज नागरिकांचा राग लक्षात घेऊन, या पक्षांतील नेत्यांनी युतीकरिता मोहीम सुरू केल्याची माहिती आहे.
पाणीटंचाईमुळे टँकरचाच आधार
दिव्यातील डम्पिंग ग्राउंड बंद झाले असले तरी, जुन्या कचऱ्याचे ढीग अजून आहेत. पाणीपुरवठा सुधारण्यासाठी मांडण्यात आलेली रिमॉडेलिंग योजना कागदावरच राहिल्याने आजही रहिवाशांना टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. रस्त्यांची कामे अर्धवट, निकृष्ट दर्जाची आहेत. फेरीवाल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मागील १५ दिवसांपासून कचरा उचललाच गेलेला नाही. सकाळी दिव्यात लोकलमध्ये प्रवेश करणे अशक्य होते. भाजपने याच मुद्द्यावर आंदोलन केले असले, तरी समस्या तशाच आहेत. त्यामुळे नागरिकांची नाराजी वाढली आहे. या सर्व असंतोषाच्या पार्श्वभूमीवर भाजप, उद्धवसेना आणि मनसे एकत्र येऊन “शिंदेसेनेला राजकीय उत्तर” देण्याच्या तयारीत असल्याचे चित्र आहे.