भिवंडीत राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपचे आंदोलन
By नितीन पंडित | Updated: November 18, 2022 18:44 IST2022-11-18T18:44:01+5:302022-11-18T18:44:50+5:30
भिवंडीत राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपने आंदोलन केले.

भिवंडीत राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपचे आंदोलन
भिवंडी: स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अपशब्द वापरल्याच्या निषेधार्थ राहुल गांधींच्या विरोधात भिवंडीतील छ. शिवाजी महाराज चौकात भाजप कार्यकर्त्यांनी शुक्रवारी आमदार महेश चौघुले व भाजप शहराध्यक्ष संतोष शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करत काँग्रेस विरोधात घोषणाबाजी केली. राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जाणूनबुजून अपमान करत आहेत हा अपमान म्हणजे सावरकरांचा आणि देशभक्त भारतीयांचा अपमान आहे. ज्या महाराष्ट्रात या सुपुत्राचा जन्म झाला त्या महाराष्ट्राचा अपमान राहुल गांधी करत आहेत, एक मराठी माणूस ज्याने भारताच्या स्वातंत्र्यासाठी काळ्यापाण्याची शिक्षा भोगली त्या सावरकरांचा अपमान म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान आहे अशी प्रतिक्रिया भाजपा आमदार महेश चौघुले यांनी यावेळी दिली.
तर सावरकरांच्या बाबतीत अपमानास्पद जेवढे काही करता येईल तेवढे काँग्रेसने केले आहे. केवळ कालचं विधान नाही तर स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल काँग्रेसला जेवढे काही शक्य होईल ते ते अपमानास्पद काँग्रेस करत असून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या निष्ठा, श्रद्धा आणि देशप्रेम याच्यावर जेवढे आक्रमण करता येईल तेवढे काँग्रेसने केले आहे अशी प्रतिक्रिया जिल्हाध्यक्ष संतोष शेट्टी यांनी दिली आहे.
या आंदोलनात महासचिव राजु गाजेंगी, युवा मोर्चा अध्यक्ष राजु चौघुले, मंडळ अध्यक्ष विकास बाफना, कल्पना शर्मा, कृष्णा गाजेगी, निखिल शिंदे, सत्यशिला जाधव, मिडिया प्रमुख पी डी यादव जिल्हा युवा मोर्चा पदाधिकरी, व भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.